Join us

औद्योगिक सुधारणांवर होणार नाही दुसऱ्या लाटेचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 4:33 AM

निर्मला सीतारामन; अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा कोणताही परिणाम औद्योगिक सुधारणांवर होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, २०२० मधील परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले होते. यंदा मात्र स्थानिक पातळीवर निर्बंध आहेत. काही ठिकाणी रुग्णांचे आकडे वाढलेले दिसतात. दिल्लीसारख्या काही ठिकाणी माल वाहतुकीवर परिणाम झालेला दिसतो. मात्र, याचा परिणाम या आठवड्याच्या पलीकडेही होईल का, याबाबत आताच काही सांगता येत नाही. त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. मात्र, सध्या तरी उद्योग क्षेत्र सुधारणेच्या मार्गावर कायम आहे. त्यामुळे आपल्यावर प्रतिकूल परिणाम होईल, असा निष्कर्ष काढण्याची घाई मी करणार नाही.

सीतारामन यांनी सांगितले की, या क्षणी लोकांचे प्राण वाचविण्यास आमचे प्राधान्य आहे. आम्ही ऑक्सिजन आयात करीत आहोत. आपल्याकडे तपासणी आणि लसीकरणाची क्षमता आहे. पूर्ण अचूक असेल किंवा नसेलही; पण आपण (राज्ये) एकमेकांना मदत करीत आहोत. सीतारामन यांनी म्हटले की, आपली अर्थव्यवस्था अजूनही खुली ठेवण्यात आली आहे. काही भागांत लॉकडाऊन असले तरी संसर्ग साखळी तुटल्यानंतर ते उठविले जातील, अशी अपेक्षा आहे. आपले आर्थिक नियोजन आजही योग्य मार्गावर आहे. आपल्या निर्गुंतवणूक कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही. विकास वित्त संस्थांची स्थापना आणि संस्थात्मक सुधारणा घोषित केल्याप्रमाणेच होतील. 

चालू वित्त वर्षात १.७५ लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केलेले आहे. बीपीसीएल, एअर इंडिया आणि शिपिंग कॉर्पोरेशन यांसारख्या मोठ्या कंपन्यांची विक्री केली जाणार आहे.

अर्थव्यवस्थेला रुग्णसंख्येचा अडथळा : दासn भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेच्या मार्गात कोविड-१९ ची वाढती रुग्णसंख्या हा एकमेव अडथळा आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या इतिवृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. दास यांनी बैठकीत सांगितले की, कोविड-१९ च्या साथीच्या रुग्णांची वाढती संख्या आणि स्थानिक व विभागीय पातळीवरील लॉकडाऊन यामुळे वृद्धी अंदाजाबातही अनिश्चितता निर्माण झाली आहे. n दास यांनी म्हटले की, गेल्या वर्षभरात आपण जे शिकलो आहोत, त्यातून सध्याच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी लाभ व्हायला हवा. सध्या अर्थव्यवस्थेत जी सुधारणा होत आहे, ती अशीच कायम कशी राहील, याकडे लक्ष देणे ही आजची गरज आहे. सुधारणा कायम राहिली तरच ती व्यापक आणि टिकाऊ होईल.

टॅग्स :निर्मला सीतारामनकोरोना वायरस बातम्या