मुंबई : सहकारी बँकांसह देशातील बँकिंग क्षेत्र सुरक्षित आहे. केवळ एका सहकारी बँकेतील घटनेमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्राला बोल लावणे योग्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी केले.रिझर्व्ह बँकेने २३ सप्टेंबर रोजी पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर निर्बंध लादले आहेत. आर्थिक गैरव्यवहारांची, तसेच हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (एचडीआयएल) दिलेल्या कर्जाची माहिती दडविल्यामुळे बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्बंधांत सहा महिन्यांसाठी नवीन कर्ज देणे, तसेच ठेवी स्वीकारणे यावर बंदी आणि पैसे काढण्यावर १ हजार रुपयांची मर्यादा यांचा समावेश होता. पैसे काढण्यावरील मर्यादा पहिल्यांदा वाढवून १० हजार व त्यानंतर २५ हजार करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बँकांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्या अनुषंगाने शक्तिकांत दास यांनी हे वक्तव्य केले आहे.चौथे दुमाही पतधोरण जाहीर करताना शक्तिकांत दास यांनी पत्रकारांना सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या वतीने मी स्पष्ट करू इच्छितो की, देशातील बँकिंग व्यवस्था सुदृढ आणि स्थिर आहे. विनाकारण घाबरण्याचे कारण नाही.सहकारी बँकांच्या नियमांचा आढावा घेणारपीएमसी बँकेतील घोटाळ्याबाबत दास यांनी सांगितले की, पीएमसी बँकेतील गैरव्यवहारांची माहिती समोर येताच, रिझर्व्ह बँकेने अत्यंत चपळाईने आणि तातडीने कारवाई केली आहे. देशातील सहकारी बँकांची स्थितीही सदृढ आहे. एका बँकेतील घटनेमुळे एकूणच सगळ्या सहकारी बँकांना बोल लावणे चूक आहे. शक्तिकांत दास यांनी पुढे म्हटले की, सहकारी बँकांच्या सर्व नियमांचा रिझर्व्ह बँक आढावा घेईल, तसेच गरज भासल्यास त्यावर सरकारशी चर्चाही करील.
सहकारी बँकांसह देशातील बँकिंग क्षेत्र सुरक्षित, शक्तिकांत दास यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:38 AM