घर ही प्रत्येकाची गरज आहे, पण ही गरज पूर्ण करणं ही काही सोपी गोष्ट नाही. घरांच्या किंमती झपाट्यानं वाढत आहेत. त्यामुळे लाखो रुपये जमा करुन घर विकत घेणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. त्यामुळे बहुतांश लोक बँकांकडून कर्ज घेऊन त्यांच्या घराच्या गरजा पूर्ण करतात. परंतु गृहकर्ज हे खूप दीर्घ काळासाठी असते, त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी ईएमआय भरावा लागतो.
घर घेण्यासाठी भरपूर आर्थिक नियोजन आणि बचतीचा अवलंब करावा लागतो. अनेक वर्षांच्या बचतीनंतर खरेदी केलेलं घर आपल्यासाठी फार मोठी बाब असते. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागण्यासारखी घटना घडली तर काय होईल? याचा विचार करूनही अंगावर काटा येतो.
अशा परिस्थितीत तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकेल का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आपण जसा वाहनांचा विमा काढून घेतो. त्याचप्रमाणे घराचाही विमा काढणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा घरामध्ये अशी कोणतीही अनुचित घटना घडते, ज्यामुळे घराचं नुकसान होतं, तेव्हा विम्याच्या मदतीनं नुकसान भरून काढता येतं.
काय आहे होम इन्शूरन्स?
हा एक प्रकारचा मालमत्तेचा विमा आहे. यामध्ये विमाधारकाला नुकसान भरपाई मिळते. हे तुमच्या घराला अनपेक्षित किंवा अपेक्षित नुकसानीपासून कव्हर प्रदान करेल. त्यात घराचं स्ट्रक्चर तसंच घरातील वस्तूंचाही समावेश होतो. पण यासाठी आधी तुम्हाला घराचा विमा घ्यावा लागेल आणि त्याचा नियमित हप्ता भरावा लागेल.
होम इन्शूरन्सचे फायदे
होम इन्शुरन्स घेऊन तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही केवळ घरच नाही तर घराबाहेरील परिसर, गॅरेज यांचाही समावेश करू शकता.
नैसर्गिक आपत्तीतही सुरक्षा
नैसर्गिक आपत्तींपासून घराचं रक्षण करण्यासाठी म्हणजेच या घटनांमुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी होम इन्शूरन्स काढणं अत्यंत आवश्यक आहे. भूकंप, अतिवृष्टी किंवा पुरामुळे अनेक वेळा घरांची पडझड किंवा नुकसान होतं. अनेकवेळा अशा परिस्थितीत लोकांना खूप नुकसान सहन करावं लागतं. ज्याची भरपाई तुम्ही होम इन्शुरन्सद्वारे करू शकता.
चोरी झाल्यास संरक्षण
जर तुम्ही घराचा विमा घेतला असेल तर तुम्हाला चोरीसारख्या घटनांपासून संरक्षणदेखील मिळू शकते. अशा अनेक पॉलिसी आहेत ज्या घरात चोरी झाल्यास नुकसान भरपाई देतात.
व्यापक संरक्षण
घराचा विमा घेऊन, तुम्ही तुमच्या घराला आणि आसपासच्या मालमत्तेला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवू शकता. पण इन्शूरन्स घेताना तुम्हाला त्याचा तपशील आधी द्यावा लागेल. तुम्ही अशी पॉलिसीदेखील निवडू शकता जे तुम्हाला अॅड ऑन पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूही त्यात समाविष्ट करू शकता.
लायबलिटी कव्हरेज
होम इन्शूरन्स असण्याचा एक फायदा म्हणजे तुमची लायबलिटी कव्हर करणं. हे मालमत्तेचं नुकसान, तसंच कामगार किंवा तृतीय पक्षाच्या आकस्मिक मृत्यूपासून संरक्षण देखील प्रदान करतं.