Join us

रिलायन्स कम्युनिकेशन व एअरसेलच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 8:10 PM

रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एअरसेल यांच्या वायरलेस व्यवसायाच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एअरसेल यांच्या वायरलेस व्यवसायाच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सचा कर्जाचा बोजा 20 हजार कोटी रुपयांनी तर अअरसेलचा कर्जाचा बोजा चार हजार कोटी रुपयांनी हलका होणार आहे. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातली ही महत्त्वाची घटना मानण्यात येत आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रात ढवळाढवळ होत असून अनेक महिने चर्चा सुरू असलेले हे विलिनीकरण त्याचीच परिणती मानण्यात येत आहे.
दोन्ही कंपन्या आणखी भागभांडवलासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या संपर्कात आहेत. या विलिनीकरणामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एअरसेलची पालक कंपनी मॅक्सिस कम्युनिकेशन्स बेऱ्हाड या दोघांच्या भागधारकांना यामुळे लाभ मिळणार असल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी सांगितले. मॅक्सिसने एअरसेलमध्ये आत्तापर्यंत 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. 
या विलिनीकरणामुळे संयुक्त कंपनी देशातल्या टॉप चार कंपन्यांच्या पंगतीत आली आहे. तसेच स्पेक्ट्रमच्या बाबतीत संयुक्त कंपनी दुसऱ्या स्थानी असेल आणि देशातल्या सर्व म्हणजे 22 सर्कल्समध्ये सेवा उपलब्ध असेल. 
शिवाय मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओबरोबर झालेल्या करारामुळे संयुक्त कंपनीच्या ग्राहकांना 4जी सेवा देखील मिळणार असल्याचे रिलायन्स कम्युनिकेशन्सने स्पष्ट केले आहे.