Join us  

श्रीमंत पण दिवाळे निघालेल्या बॅंकांची अतिशय स्वस्तात विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 9:18 AM

स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष ॲलेन बरसेत यांनी सांगितले की, हा अधिग्रहण सौदा आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्राच्या स्थिरतेसाठी एक मोठे पाऊल आहे.

जिनेव्हा : आर्थिक संकटात सापडलेली जगप्रसिद्ध बँक ‘क्रेडिट सुइस’चे बलाढ्य बहुराष्ट्रीय वित्तीय कंपनी ‘यूबीएस स्वित्झर्लंड’ ३.२५ अब्ज डॉलरला अधिग्रहण करणार आहे. या दोन्ही स्विस बँका आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेतील सिग्नेचर बँकेचीही विक्री झाली आहे. दोन्ही बँकांकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती असूनही अतिशय स्वस्तात त्याची विक्री झाली आहे.

स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष ॲलेन बरसेत यांनी सांगितले की, हा अधिग्रहण सौदा आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्राच्या स्थिरतेसाठी एक मोठे पाऊल आहे. क्रेडिट सुइसचे पतन देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीसाठी धोकादायक ठरू शकले असते. भागधारकांच्या मंजुरीशिवाय बँकेचे विलीनीकरण करण्यासाठी स्वित्झर्लंडच्या सक्षम शासकीय संस्थेने एक आपत्कालीन आदेश जारी केला आहे. क्रेडिट सुइसचे चेअरमन ॲक्सेल लेहमन यांनी सांगितले की, या सौद्यामुळे एक मोठा बदल घडून येईल. हा क्रेडिट सुइससाठी एक ऐतिहासिक मात्र अत्यंत आव्हानात्मक दिवस आहे. यूबीएसचे चेअरमन कोम केलेहर यांनी सांगितले की, हे अधिग्रहण असंख्य शक्यतांना जन्म देईल.

‘क्रेडिट सुइस’ची हाताळणी काळजीने क्रेडिट सुइसने आपले समभाग घसरल्यानंतर मागच्या गुरुवारी स्विस सेंट्रल बँकेकडून (केंद्रीय बँक) ५४ अब्ज डॉलरचे कर्ज घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, ही योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी यूबीएसला संकटग्रस्त बँकेचे अधिग्रहण करण्याची सूचना केली. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) आणि सिग्नेचर बँक या  २ बँका नुकत्याच कोसळल्यामुळे क्रेडिट सुइसचे संकट काळजीपूर्वक हाताळले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

समभाग घसरलेक्रेडिट सुइसचे यूबीएस स्वित्झर्लंड अधिग्रहण करणार असल्याचे वृत्त येताच या दोन्ही कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. क्रेडिट सुइसचे समभाग ६३ टक्के, तर यूबीएसचे समभाग १४ टक्के खाली आले. जगातील वित्तीय क्षेत्रात सध्या प्रचंड अस्थिरता आहे.  

५० हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात क्रेडिट सुइस बँक कोसळल्यास जगभरात हाहाकार उडण्याचा धोका आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. क्रेडिट सुइसमध्ये ५० हजार कर्मचारी असून त्यातील १७ हजार कर्मचारी स्वित्झर्लंडमध्ये आहेत. 

३८ अब्ज डाॅलर्सची संपत्ती, बँक विकली २.७ अब्ज डाॅलर्सलान्यूयाॅर्क : न्यूयाॅर्क कम्युनिटी बॅंक २.७ अब्ज डाॅलर्सला सिग्नेचर बँक विकत घेणार आहे. या व्यवहारानंतर सिग्नेचर बँकेच्या ४० शाखा फ्लॅगस्टार बँक या नावाने ओळखल्या जातील. सिग्नेचर बँकेच्या ३८.४ अब्ज डाॅलर्सची संपत्ती फ्लॅगस्टारला मिळणार आहे. बँकेने वितरित केलेले ६० अब्ज डाॅलर्सचे कर्जही सुरक्षित आहे.

टॅग्स :बँक