वाॅशिंग्टन/लंडन : अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅली बॅंक बुडाल्यानंतर जगभरात बॅंकिंग क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले. त्याबाबत एक दिलासादायक बातमी आहे. या बॅंकेचे इंग्लंडमधील युनिट एचएसबीसी बॅंक विकत घेत आहे. तेदेखील केवळ एक पाैंड अर्थात ९९ रुपयांना. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनीही बॅंकेच्या खातेदारांना दिलासा दिला आहे. देशातील बॅंका सुरक्षित आहेत. त्यातून खातेदारांना साेमवारपासून खात्यातून पैसे काढता येतील, सर्व बॅंकिंग सेवा वापरता येतील, असे बायडेन म्हणाले.
अमेरिकेतील फेडरल डिपाॅझिट इन्शुरन्स कार्पाेरेशन, फेडरल रिझर्व्ह आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी पुढील कारवाईला मंजुरी दिली. या अडचणीतून ठेवीदारांना बाहेर काढताना करदात्यांचा पैसा वापरला जाणार नाही, असे अर्थ मंत्रालय, फेडरल रिझर्व्ह आणि महामंडळाच्या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
काय आहे ताेडगा?
बॅंकांच्या संकटासाठी २५ अब्ज डाॅलर्स एवढी रक्कम बाजुला काढण्यात आली आहे. त्यातून या बॅंकांच्या ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील. विम्याचे संरक्षण नसलेल्या ठेवीदारांची संख्या खूप जास्त आहे. अशाच पद्धतीने न्यूयाॅर्क येथील सिग्नेचर बॅंकेबाबतही ताेडगा काढण्यात येणार आहे. बॅंकेच्या व्यवस्थापन मंडळातील वरिष्ठ सदस्यांना हटविले आहे. असे फेडरल रिझर्व्हने जाहीर केले.
नाममात्र किमतीत अधिग्रहण
- एसव्हीबी बॅंकेच्या ब्रिटनमधील युनिट अधिग्रहणासाठी १ पाउंड किंमत केवळ नावापुरती आहे. बॅंकेच्या कर्जाला सरकारचे संरक्षण आहे.
- एचएसबीसीला काेणत्याही कर्जाची परतफेड करावी लागणार नाही. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ब्रिटनमधील खातेदारांना पैसे काढण्यासाेबतच सर्व बॅंकिंग सेवांचा लाभ घेता येईल.
एवढी संपत्ती मिळेल
- १० मार्चपर्यंत ब्रिटन युनिटकडे ५.५ अब्ज पाउंड एवढे कर्ज हाेते. तर ६.७ अब्ज पाउंड एवढी जमा रक्कम हाेती.
- बॅंकेने ३१ डिसेंबर २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षात ८८ दशलक्ष पाउंड एवढा नफा कमविला हाेता.
बॅंक सुरक्षित आहे. संकटासाठी दाेषी असलेल्यांवर कारवाई करू - जाे बायडेन
‘सिग्नेचर बँके’लाही ठोकले टाळे; ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’कडे बँकेचा ताबा
वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यू यॉर्क स्थित ‘सिग्नेचर बँक’ रविवारी बंद करण्यात आली. त्याआधी शुक्रवारी ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ (एसव्हीबी) बंद करण्यात आली होती. हे अमेरिकेतील बँकिंग इतिहासातील तिसरे मोठे अपयश मानले जात आहे. एसव्हीबी बँकेच्या धक्क्यापाठोपाठ सिग्नेचर बँकेचा धक्का बसल्यामुळे अमेरिकेतील वित्तीय क्षेत्र हादरले आहे.
२००८ च्या मंदीच्या काळात अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन म्युच्युअल’ ही मोठी बँक कोसळली होती. हे अमेरिकी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बँकिंग पतन ठरले होते. त्यानंतर आता अमेरिकेच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बँकिंग पतन घडले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेतील न्यू यॉर्क राज्याच्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ने (एफडीआयसी) ‘सिग्नेचर बँके’चा ताबा घेतला. या बँकेकडे मागील वर्षाच्या अखेरपर्यंत ११०.३६ अब्ज डॉलरची संपत्ती होती. तसेच बँकेच्या खात्यांत फक्त ८८.५९ कोटी डॉलर जमा होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"