Semiconductor Plants Narendra Modi: भारताला सेमीकंडक्टर(Semiconductor) क्षेत्रात ग्लोबल प्लेअर बनवण्याच्या दिशेने केंद्रातील भाजप सरकारने मोठे पाउल टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज(दि.12 मार्च) ‘इंडियाज टेकेड: चिप्स फॉर विकसित भारत’ कार्यक्रमातून देशाला 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. यातील दोन गुजरातमध्ये, तर एक असामध्ये उभारला जाणार आहे.
भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल...
यावेळी पंतप्रधान म्हणाले, 'हा ऐतिहासिक दिवस आहे, कारण आपण उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलत आहोत. आज भारत अंतराळ, आण्विक आणि डिजिटल शक्ती म्हणून उदयास आला आहे. आता आगामी काळात सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारत महासत्ता बनले. या क्षेत्रातील वाढीचा सर्वाधिक फायदा देशातील तरुणांना होईल. 21वे शतक तंत्रज्ञानावर आधारित आहे, इलेक्ट्रॉनिक चिप्सशिवाय या नवीन जगाची कल्पनाही करता येत नाही. मेड इन इंडिया चिप्स भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जातील. आपला देश लवकरच सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचे केंद्र बनेल.'
India is set to become a prominent semiconductor manufacturing hub. The three facilities will drive economic growth and foster innovation.https://t.co/4c9zV3G9HL
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2024
सेमीकंडक्टर क्षेत्र विकासाचे प्रवेशद्वार
'दळणवळणापासून वाहतुकीपर्यंत...अनेक क्षेत्रात सेमीकंडक्टर क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. देशात सेमीकंडक्टर प्लांटच्या स्थापनेतून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सेमीकंडक्टर क्षेत्र हे विकासाचे प्रवेशद्वार आहे. एकीकडे आपण देशातील गरिबी झपाट्याने कमी करत आहोत, तर दुसरीकडे भारतात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करुन देशाला आत्मनिर्भर बनवत आहोत. भारत स्टार्टअप इको-सिस्टममधील तिसरा सर्वात मोठा खेळाडू आहे. आता सेमीकंडक्टर क्षेत्रात आपल्या स्टार्टअपसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
चीनला बसणार धक्का
देशातील सेमीकंडक्टर उद्योगाच्या या निर्णयामुळे चीनला मोठा धक्का बसणार आहे. जगभरातील देशांमध्ये भारताच्या चिप मिशनबद्दल उत्सुकता आहे. अमेरिका, जपान, तैवान येथील कंपन्या भारताकडे वळत आहेत. भारताच्या सेमीकंडक्टर मिशनने चीनची अस्वस्थता वाढवली आहे. याचे कारण म्हणजे, सेमीकंडक्टर उत्पादनात सध्या चीनचे वर्चस्व आहे. जगभरातील एकूण सेमीकंडक्टर विक्रीपैकी एक तृतीयांश वाटा चीनचा आहे. अमेरिकेसह जगभरातील देश सेमीकंडक्टरसाठी चीन आणि तैवानवर अवलंबून आहेत. सेमीकंडक्टरचा व्यवसाय खूप मोठा आहे. पुढील 7 वर्षांत सेमीकंडक्टर मार्केट दुप्पट होईल असा अंदाज आहे. आता भारतात चिप्स तयार झाल्यानंतर चीनवरील अवलंबीत्व कमी होईल.
संबंधित बातमी- Tata उभारणार देशातील पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट, ९१००० कोटींची गुंतवणूक