- संजय शर्मा
नवी दिल्ली - मोबाइल फोन, टेलिव्हिजन, संगणक हार्डवेअर, लॅपटॉप, ऑटोमोबाइलपासून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भारत पुढील पाच वर्षांनी निर्यात करणार आहे. ही गेम चेंजर स्थिती सेमी कंडक्टरच्या भारताची झेप कोणीही भारतातील मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे येणार आहे.
सेमी कंडक्टरचे तंत्रज्ञान भारताला आजवर जगातील कोणीही देण्यास तयार नव्हते. काही युरोपियन देशांनी भारताला तंत्रज्ञान देण्याच्या बदल्यात नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव आणला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर आता भारतासाठी गेम चेंजर स्थिती निर्माण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर झालेल्या करारानंतर अमेरिका सेमी कंडक्टरचे तंत्रज्ञान देण्यास तयार झाली आहे. अमेरिकी कंपनी मायक्रॉनचा अहमदाबादेतील सेमी कंडक्टरचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. कंपनी येथे २.७५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
सेमी कंडक्टर क्षेत्रात भारत पुढील पाच वर्षांत जगातील सर्वांत मोठा हब बनणार आहे. भारताची पहिली स्वदेशी सेमी कंडक्टर चिप डिसेंबर २०२४पर्यंत बाजारात येणार आहे.
भारताची झेप कोणीही रोखू शकणार नाही
- सेमी कंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे भारत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक, सॉफ्टवेअर, लॅपटॉप, मोबाइल फोन, टेलिव्हिजन, ऑटोमोबाइलसाठी बाहेरील देशांवर अवलंबून होता.
- सेमी कंडक्टर चिपचे उत्पादन भारतातच झाल्यास आता भारताची या क्षेत्रातील मोठी झेप कोणीही रोखू शकत नाही.
- अमेरिकेबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरचा करार करून मोठा विजय प्राप्त केला आहे. त्याचा परिणाम पुढील दोन-तीन वर्षात दिसणार आहे. त्यामुळे भारतातच जगातील मोठ्या कंपन्यांचे टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मोबाइल फोन, ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्या कार, दुचाकी पूर्णपणे स्वदेशी निर्मित होणार आहेत.
विशेष म्हणजे या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सेमी कंडक्टरचा वापर होतो. भारताजवळ हे तंत्रज्ञान नव्हते.
केंद्रीय दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितले की, पुढील पाच वर्षात भारत सेमी कंडक्टरच्या दुनियेतील सर्वांत मोठा हब बनणार आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञ तयार करण्याचे कामही भारतात सुरु झाले आहे. अनेक विद्यापीठे व महाविद्यालयांनी सेमी कंडक्टरचे शिक्षण सुरु केले आहे. भारतात पुढील पाच वर्षात जगाचे नेतृत्व करण्याची शक्ती या एका गेम चेंजर कराराने येणार आहे.