Withdrawal of 2000 Rupee Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी घोषित केल्यानंतर ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून नवीन २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. यानंतर आता २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतली जात आहे. यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावरून केंद्रातील मोदींवर टीका करण्यात येत आहे. यातच आता १ हजार रुपयांची नोट पुन्हा चलनात येण्याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी एक भाकित केले आहे.
खरे पाहता सरकारने आणि पंतप्रधानांनी या निर्णयासाठी देशाची माफी मागायला पाहिजे होती. पण माफी मागण्याऐवजी घेतलेला चुकीचा निर्णय दुरुस्त करण्यासाठी आता बरोबर उलटा निर्णय सरकारला घ्यावा लागतो ही सरकारची नामुष्की आहे, या शब्दांत भालचंद्र मुणगेकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच अशा नामुष्कीमध्ये आरबीआयने कधीही सामिल होता कामा नये. आरबीआयने दुध का दूध-पानी का पानी अशा स्वरुपचा स्वायत्त निर्णय घेणे अपेक्षित होते. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या कायद्यानुसार स्वायत्त आहे, असे मत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले आहे.
१ हजार रुपयांची नोट चलनात आणावी लागणार!
२ हजार रुपयांची नोट मागे घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेचा सर्व भार आता ५०० रुपयांच्या नोटांवर पडेल. याचा साधा अर्थ असा की, ५०० रुपयांच्या नोटा हेच फक्त चलन भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात चालणार नाही. त्यामुळे आरबीआयला त्वरीत १ हजार रुपयांची नोट पुन्हा चलनात आणावी लागेल. हे तुम्हाला आजच सांगतो आहे. जो निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. तो दिवाळखोरपणाचा निर्णय होता, तो सिद्ध झाल्याने आता सरकारला ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणाव्या लागतील, असा दावा भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.