Join us

शेअर बाजारात सतर्कतेचा दबदबा

By admin | Published: January 01, 2015 11:59 PM

२0१५ च्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात सतर्कता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अवघ्या ८ अंकांनी वाढून २७,५0७ अंकांवर बंद झाला.

मुंबई : २0१५ च्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात सतर्कता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अवघ्या ८ अंकांनी वाढून २७,५0७ अंकांवर बंद झाला. वास्तविक सेन्सेक्सने सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदविली आहे. तथापि, गुरुवारच्या अत्यल्प वाढीला विदेशातील मंदी कारणीभूत होती. विदेशातील बाजार बंद असल्यामुळे भारतीय बाजारात मरगळीचे वातावरण दिसून आले.बीएसई स्मॉलकॅप १.२५ टक्क्यांनी, तर मिडकॅप 0.६५ टक्क्यांनी वाढला. छोट्या गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे हे दोन्ही निर्देशांक तेजीत राहिले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मंदीनेच उघडला. त्यानंतर तो आणखी खाली गेला. दिवसाचा बहुतांश काळ तो नकारात्मक कल दर्शवीत होता. नंतर मात्र खरेदीला थोडा जोर आला. सत्राअखेरीस २७,५0७.५४ अंकांवर बंद होताना सेन्सेक्सने ८.१२ अंकांची वाढ नोंदविली. ही वाढ 0.0३ टक्के आहे. गेल्या ५ सत्रांत सेन्सेक्सने २९९ अंक कमावले आहेत.५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी १.३0 अंकांनी अथवा 0.0२ टक्क्यांनी वाढून ८,२८४ अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारांना आज नववर्षाची सुटी होती. युरोपातील बाजारही सुटीमुळे बंद होते. चीनच्या वस्तू उत्पादन क्षेत्राने १८ महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. उरलेले समभाग कोसळले. वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांत भारती एअरटेल, सेसा स्टरलाईट, टाटा स्टील, भेल, ओएनजीसी, बजाज आॅटो आणि हिंदाल्को यांचा समावेश आहे. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,८३१ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. ९७५ कंपन्यांचे समभाग घसरले. ११६ कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल घसरून १,९२८.२६ कोटी झाली. काल ती २,४६४.९३ कोटी होती. २0१४ मध्ये ३0% वाढ२0१४ या संपूर्ण वर्षात सेन्सेक्सने सरासरी ३0 टक्के वाढ नोंदविली आहे. ही गेल्या ५ वर्षांतील सर्वांत चांगली कामगिरी ठरली आहे. वर्षभरात सेन्सेक्सने ६३५८.९४ अंकांची कमाई केली.रुपया घसरलानववर्षाच्या प्रारंभीच भारतीय रुपयाची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३२ पैशांच्या घसरणीसह ६३.३५ रुपयांवर आला. ही गेल्या दोन आठवड्यात एका दिवसात झालेली मोठी घट आहे.