Join us  

मुंबई शेअर बाजार १0४ अंकांनी वधारला

By admin | Published: August 09, 2016 3:27 AM

सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात खरेदीचा जोर कायम राहिल्याने सोमवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे

मुंबई : सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात खरेदीचा जोर कायम राहिल्याने सोमवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निफ्टीही १0४ अंकांनी वाढला. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर कायम राहण्याच्या शक्यतेने आढाव्याच्या आदल्या दिवशी बाजारात तेजी निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुप्रतीक्षित वस्तू व सेवा कर विधेयक मार्गी लागल्याने बाजारात आधीच खरेदीचा जोर आहे. त्यातच जागतिक बाजारातही तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे सुपरिणाम बाजारात दिसून आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.२0 अंकांनी अथवा 0.३२ टक्क्यांनी वाढून ८,७५0.२0 अंकांवर बंद झाला. १५ एप्रिल २0१५ नंतरचा हा सर्वोच्च बंद ठरला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १0४.२२ अंकांनी अथवा 0.३७ टक्क्यांनी वाढून २८,१८२.५७ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स ३८0.८४ अंकांनी वाढला होता. सूत्रांनी सांगितले की, देशातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नफ्यात १८.१३ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. या काळात कंपनीला ८८३.१0 कोटी रुपयांचा नफा झाला. (प्रतिनिधी)