मुंबई : ग्रीस आणि युरोपीय देशांत बचाव पॅकेजबद्दल समझोता झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत सोमवारी चैतन्य पसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ३00 अंकांनी वाढला. ही गेल्या तीन आठवड्यातील सर्वांत मोठी एकदिवशीय वाढ ठरली. औद्योगिक उत्पादनाच्या कमजोर आकड्यांनी रिझर्व्ह बँकेकडून दरकपातीची शक्यता वाढविली आहे. तेही एक कारण आजच्या तेजीमागे असल्याचे ब्रोकरांनी सांगितले. मे महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग घसरून २.७ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी तो ५.६ टक्के होता. आशियातील इतर बाजारांत आज वाढ दिसून आली. युरोपीय बाजारांनी ३ टक्क्यांची उसळी घेतली. त्याचाही परिणाम भारतीय बाजारांवर झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला होता. २८ हजार अंकांचा टप्पा सेन्सेक्सने दुपारी गाठला. त्यावेळी सेन्सेक्स २८,00५.१७ अंकांवर पोहोचला. ही दिवसातील सर्वोच्च पातळी होती. त्यानंतर नफा वसुलीला ऊत आला. त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा एकदा २८ हजारांच्या खाली आला. सत्राच्या अखेरीस तो २७,९६१.१९ अंकांवर बंद झाला. २९९.७९ अंकांची अथवा १.0८ टक्क्यांची वाढ सेन्सेक्सने मिळविली. २२ जुलैनंतरची ही सर्वांत मोठी वाढ आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ४१४.0४ अंकांनी वाढला होता. दिवसभराच्या चालीत सेन्सेक्स ८ जुलैनंतर प्रथमच २८ हजार अंकांच्या वर गेला होता. गेल्या सत्रांत मिळून २८७.५३ अंकांची वाढ सेन्सेक्सने मिळविली आहे.५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा ८,४00 अंकांची पातळी गाठली. एका क्षणी तो ८,४७१.६५ अंकांवर गेला होता. सत्राच्या अखेरीस ९९.१0 अंकांची अथवा १.१९ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,४५९.६५ अंकांवर बंद झाला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई आयटी निर्देशांक सर्वाधिक १.७१ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल टेक्नॉलॉजी, आॅटो, आरोग्य, तेल आणि गॅस, तसेच ऊर्जा या क्षेत्रांतील समभाग वाढले. तत्पूर्वी शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी ४६५.२७ कोटींचे समभाग विकले. आज जाहीर करण्यात आलेल्या हंगामी आकडेवारीतून ही माहिती समोर आली. चीनच्या शांघाय कंपोजिटने सलग तिसऱ्या सत्रात तेजीची नोंद केली. हा निर्देशांक २.३९ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई १.५७ टक्क्यांनी, तसेच हाँगकाँगचा हेंगसेंग १.३0 टक्क्यांनी वाढला.
सेन्सेक्स ३00 अंकांनी वाढला; निफ्टी ८,४00 अंकांच्या पार
By admin | Published: July 14, 2015 2:19 AM