Join us

सेन्सेक्स ३७ हजारी; निफ्टीचाही नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:05 AM

विविध आस्थापनांचे जाहीर होत असलेले चांगले निकाल, परकीय तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांची चांगली खरेदी, निवळत असलेले आंतरराष्ट्रीय वातावरण, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये झालेल्या समझोत्यानंतर व्यापारयुद्धाची कमी झालेली शक्यता आणि काहीसे स्थिर झालेले इंधन दर यामुळे बाजार तेजीत राहिला.

- प्रसाद गो. जोशीविविध आस्थापनांचे जाहीर होत असलेले चांगले निकाल, परकीय तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांची चांगली खरेदी, निवळत असलेले आंतरराष्ट्रीय वातावरण, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये झालेल्या समझोत्यानंतर व्यापारयुद्धाची कमी झालेली शक्यता आणि काहीसे स्थिर झालेले इंधन दर यामुळे बाजार तेजीत राहिला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टीने नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६५०१.०५ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर हा निर्देशांक ३७३६८.६२ अंश अशा नव्या उच्चांकाची नोंद करण्यात यशस्वी झाला. त्यानंतर काहीसा खाली येत सप्ताहाच्या अखेरीस तो ३७३३६.८५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ८४०.४८ अंश म्हणजेच २.३० टक्के एवढी वाढ झाली. प्रथमच निर्देशांक ३७ हजार अंशांवर बंद झाला आहे.राष्ट्रीय शेअर बाजारातही जोरदार तेजी बघावयास मिळाली. येथील अधिक व्यापक पायांवर आधारित निफ्टी या निर्देशांकाने सप्ताहामध्ये २६८.१५ अंशांची वाढ नोंदविली. सप्ताहाच्या अखेरीस तो ११२७८.३५ अंशांवर बंद झाला आहे. मिडकॅप तसेच स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही तेजी दिसून आली. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ७१६.१६ आणि ७२८.७७ अंशांनी वाढून १५९१२.६२ अंश आणि १६४५०.२० अंशांवर बंद झाले.या महिन्याच्या प्रारंभी विक्रीचा धडाका लावलेल्या परकीय वित्तसंस्थांनी महिन्याच्या अखेरीला खरेदीला प्रारंभ केलेला दिसून आला. जुलै महिन्यामध्ये या संस्थांनी १८ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. या संस्थांनी १८.४८ अब्ज रुपये हे विविध समभागांमध्ये गुंतविले आहेत. त्याचवेळी त्यांनी कर्जरोख्यांमधून ४.८२ अब्ज रुपये काढूनहीघेतले आहेत. देशांतर्गत वित्तीय संस्थांनीही सप्ताहामध्ये मोठी खरेदी केली. जीएसटीच्या दरात सरकारने केलेली कपात तेजीला हातभार लावून गेली.बाजार भांडवलमूल्यामध्ये " ४.६७ ट्रिलियनची वाढ- शेअर बाजारातील तेजीच्या वातावरणामुळे निर्देशांकांनी नवीन उच्चांकी कामगिरी नोंदविली आहे. केवळ पाच सत्रांमध्ये गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ४.६७ ट्रिलियन रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसह बाजारातील उत्साह वाढलेला दिसून येत आहे.- मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर १५१.४४ ट्रिलियन रुपये एवढे झाले आहे. मागील शुक्रवारी ते १४६.७७ ट्रिलियन रुपये होते. याचाच अर्थ सप्ताहातील पाच दिवसांच्या उलाढालीमध्ये त्यात ४.६७ ट्रिलियन रुपयांनी वाढ झालेली दिसून आली. शुक्रवारच्या सत्रामध्ये मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांपैकी १६६५ आस्थापनांचे समभाग वाढले, तर ९७० आस्थापनांचे समभाग खाली आले आहेत. १५५ आस्थापनांच्या समभागांचे भाव ‘जैसे थे’ राहिलेले दिसून आले.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक