मुंबई : एक दिवसाच्या वाढीनंतर सोमवारी शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या आदल्या दिवशी बँकांच्या समभागांवर विक्रीचा प्रचंड दबाव राहिला. त्याचा फटका शेअर बाजारांना प्रामुख्याने बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६ अंकांनी घसरून २४,८२४.८३ अंकांवर बंद झाला.चीनमधील वस्तू उत्पादन क्षेत्राने जानेवारीत तीन वर्षांची नीचांकी पातळी गाठली आहे. या क्षेत्राचा चिनी निर्देशांक ४९.४ वर आला आहे. याचा फटकाही शेअर बाजारांना बसल्याचे ब्रोकरांनी सांगितले. भारतीय वस्तू उत्पादनाचा निर्देशांक वाढला असतानाही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले. आयसीआयसीआय बँकेचा समभाग ५.६३ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ एसबीआयचा समभाग ३.९२ टक्क्यांनी घसरला. मुंबई शेअर बाजारात सकाळी तेजीचे वातावरण होते. सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. लवकरच तो २५ हजार अंकांच्या वर पोहोचला. त्यानंतर मात्र नफा वसुली सुरू झाली. त्यामुळे सेन्सेक्स खाली घसरला.सत्राच्या अखेरीस ४५.८६ अंकांची अथवा 0.१८ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २४,८२४,८३ अंकांवर बंद झाला. शनिवारच्या सत्रात सेन्सेक्स ४0१.१२ अंकांनी वाढला होता. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७.६0 अंकांनी अथवा 0.१0 टक्क्यांनी घसरून ७,५५५.९५ अंकांवर बंद झाला. अन्य आशियाई बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. हाँगकाँगचा निर्देशांक 0.४५ टक्क्यांनी, सिंगापूरचा १.0६ टक्क्यांनी आणि शांघायचा निर्देशांक १.७८ टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारांत सकाळी नकारात्मक कल दिसून आला. चीनमधील निराशाजनक आकडेवारीचा परिणाम बाजारांवर दिसत होता. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स ४६, तर निफ्टी ८ अंकांनी घसरला
By admin | Published: February 02, 2016 3:03 AM