Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स 66 हजार, आता पुढे काय?

सेन्सेक्स 66 हजार, आता पुढे काय?

बहुतांश कंपन्यांचे आर्थिक वर्ष 2023 चे निकाल अपेक्षेनुसार आहेत. घसरता रुपया, चलनवाढ आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आल्याने गुंतवणूकदार समाधानी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 09:26 AM2023-07-23T09:26:00+5:302023-07-23T09:26:10+5:30

बहुतांश कंपन्यांचे आर्थिक वर्ष 2023 चे निकाल अपेक्षेनुसार आहेत. घसरता रुपया, चलनवाढ आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आल्याने गुंतवणूकदार समाधानी आहेत.

Sensex 66 thousand, what next? | सेन्सेक्स 66 हजार, आता पुढे काय?

सेन्सेक्स 66 हजार, आता पुढे काय?

अजय वाळिंबे, अर्थतज्ज्ञ

ता फक्त मजा बघ. हा शेअर सहा महिन्यांत डबल होईल! भरपूर घेतलेस ना? प्रॉफिट बुक केल्यावर पार्टी नक्की दे.”, प्रमोद सांगत होता. सध्या असे संवाद ऐकायला मिळतात. कोविडच्या काळात अनेक रिटेल गुंतवणूकदार शेअर बाजारात उतरले आहेत. अनेकांना शेअर बाजार उत्पन्न मिळवून देण्याचा सोपा मार्ग वाटू लागला आहे आणि त्याचे कारणही सबळ आहे. २०२३ या आर्थिक वर्षाचे तीन महिने उलटले आहेत आणि या कालावधीत मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने ५९,१०६ अंशावरून ६७,०९७ अंशापर्यंत उसळी घेऊन तो रोज नवे उच्चांक गाठत आहे.
केवळ तीन महिन्यांत १३.५% हून अधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजाराचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. तेजीची कारणे अशी की, बहुतांश कंपन्यांचे आर्थिक वर्ष २०२३ चे निकाल अपेक्षेनुसार आहेत. घसरता रुपया, चलनवाढ आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आल्याने गुंतवणूकदार समाधानी आहेत. त्यातच भारतातील चलनवाढ आटोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत भारतीय बँकांनी ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ३.९% पर्यंत मर्यादित राखून ते दशकभरातील नीचांकावर आहे, तर नक्त अनुत्पादित कर्ज केवळ १% आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट फायद्याची असून, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सध्या तरी व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. गेल्याच महिन्यात पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेची भेट यशस्वी झाली असून, डॉलरच्या तुलनेत रुपया सावरत असल्याने शेअर बाजारात उत्साह आहे. आता ही तेजी किती काळ टिकते ते महत्त्वाचे ठरेल. 

संयम महत्त्वाचा

 आता मी नक्की काय करू? नफा पदरात पाडून घेऊ की एंट्री घेऊ? बाजार अजून वर जाईल का आणि कितीपर्यंत? असे प्रश्न पडणे साहजिक आहे. शेअर बाजारात सर्वांत महत्त्वाचे काय? असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर संयम आणि निर्णय. 
 प्रत्येक वेळी घेतलेला निर्णय हा योग्य की अयोग्य, ते काळच ठरवतो. पण बऱ्याचदा घेतलेला शेअर हा खरेदीच्या दिवसापासून पडायला लागतो किंवा बराच काळ अपेक्षेने ठेवलेला शेअर विकताच वर जाऊ लागतो.
 ऐकीव माहिती- टिप्सपेक्षा अभ्यासपूर्ण गुंतवणूकच फायद्याची ठरते. या फील गुड वातावरणात वेळ आहे ती घड्याळात बघायची. कारण चांगला गुंतवणूकदार योग्य भावाने शेअर खरेदी करून योग्य काळापर्यंत सांभाळतो, म्हणूनच गुंतवणुकीची वेळ महत्त्वाची.

काय आहे ‘फोमो फॅक्टर’? 

 तेजीच्या काळात सामान्य गुंतवणूकदारांवर फोमो फॅक्टरचे (फिअर ऑफ मिसिंग आउट) गारूड होते. मायक्रो स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक्सचे आकर्षण वाटते.
 दिवाळखोरीत असलेल्या कंपन्यांच्या समभागात होणारी उलाढाल, तसेच त्यांच्या भावात येणारी तेजी, हाही चिंतेचा गंभीर विषय आहे. सामान्य गुंतवणूकदार अशा ट्रॅपमध्ये फसू शकतात. 
 यात नशिबाचा भाग असलाच तरीही असे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करून केवळ उत्तम कंपन्यांत टप्प्याटप्प्याने खरेदी- विक्रीचे धोरण ठेवावे म्हणजे असे नुकसान कमी होते.
...असे टाळा तुमचे नुकसान
सर्वसामान्य गुंतवणूकदार अनेकदा मंदीत विक्री, तर तेजीत खरेदीचे धोरण अवलंबताना दिसतात. त्यामुळे नुकसानच होते.
तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे १,००० शेअर्स असतील, तर विकतेवेळी किंवा खरेदी करताना एकावेळी केवळ १००-२०० शेअर्स विक्री/खरेदी करावी.

Web Title: Sensex 66 thousand, what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.