प्रसाद गो. जोशीदिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ग्रीसमुळे बाजाराला लागलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांनी घेतलेला विक्रीचा निर्णय अशा नकारात्मक वातावरणानंतरही पावसाने चांगली आगेकूच केल्याने बाजाराला उभारी मिळाली. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दिलेल्या आश्वासनाने बाजाराला दिलासा मिळाला. आठ प्रमुख उद्योगांमध्ये वाढ झाल्याने बाजारात तेजीचा संचार झाला.ग्रीस हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने बाजारात काहीशी चिंतेची भावना होती. सप्ताहाच्या प्रारंभापासूनच बाजार नरमाईत होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ग्रीसच्या दिवाळखोरीचा भारतावर परिणाम होणार नसल्याचे जाहीर केल्याने बाजाराला दिलासा मिळाला.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सलग तिसऱ्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक मागील सप्ताहापेक्षा एक टक्का वाढून २८०९२.७९ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा हा निर्देशांक २८०.९५ अंशांनी वाढला. या निर्देशांकाने २८ हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजाराला दिलासा मिळाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८४०० अंशांची पातळी ओलांडून बंद झाला. सप्ताहभरात या निर्देशांकामध्ये १०३.८० अंश म्हणजेच १.२४ टक्के वाढ होऊन तो ८४८४.९० अंशांवर बंद झाला.देशाच्या विविध भागांत मान्सून आता स्थिरावू लागला आहे. पाऊस कमी होणार या भीतीने प्रथम गारठलेला बाजार आता शास्त्रज्ञांनी पाऊस नेहमीप्रमाणे होणार अशी शक्यता वर्तविल्याने आनंदात आहे. याचा परिणाम गतसप्ताहात बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्यामध्ये झाला. देशातील पाऊस चांगला होेणे बाजाराला लाभदायक आहे.ग्रीसमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे परकीय वित्तसंस्था या चिंतेमध्ये पडले आहेत. त्यामुळेच गतसप्ताहात या संस्थांनी केवळ विक्रीचाच मार्ग अवलंबला होता यामुळे बाजारावर विक्रीचे दडपण आले; मात्र उत्तरार्धात खरेदी करणारे अनेक जण असल्याने बाजारात वाढ झाली. आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याची बातमी बाजाराला तेजीकडे घेऊन गेली. कोळसा, खनिज तेल, वीज, नैसर्गिक वायू, खते, पोलाद, सिमेंट आणि रिफायनरी या उद्योगांमध्ये मे महिन्यात उत्पादन वाढले. मागील वर्षी या उद्योगांचे उत्पादन ३.९ टक्के होते, ते यंदा ४.४ टक्के झाले. अर्थव्यवस्था सुधारू लागल्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीने स्वागत केले.
संवेदनशील निर्देशांक पुन्हा २८ हजारांच्या पार
By admin | Published: July 05, 2015 10:26 PM