- प्रसाद गो. जोशीसप्ताहाचा प्रारंभ काहीशा मंदीने झाल्यानंतर आंतरराष्टÑीय बाजारामध्ये खाली येत असलेले खनिज तेलाचे दर, बळकट होणारा रुपया यामुळे परकीय वित्तसंस्थांनी तसेच स्थानिक परस्पर निधींनी मोठी गुंतवणूक केल्याने सप्ताहाचा उत्तरार्ध तेजीचा राहिला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बॅँकांच्या समभागांनी जोरदार मुसंडी मारल्याने संवेदनशील निर्देशांक ३६ हजारांच्या वर बंद झाला. निफ्टीला मात्र ११ हजारांचा पल्ला गाठता आला नाही.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५,८५९.६६ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर तो ३६,१९४.७८ ते ३५,०१०.८२ अंशांच्या दरम्यान खाली-वर होताना दिसला. सप्ताहाच्या अखेरीस ३६,०७६.७२ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ३३४.६५ अंशांनी (०.९३ टक्के) वाढ झाली आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे निर्देशांक ३६ हजारांचा टप्पा पार करू शकला.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही सप्ताहाच्या प्रारंभी तेजी होती. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १०,८५९.९० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात १०५.९० अंशांनी (०.९८ टक्के) वाढ झाली आहे.या निर्देशांकाला ११ हजार अंशांचा टप्पा गाठण्यात मात्र अपयश आले. मिडकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकामध्येही वाढ झाली आहे. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १०७.२१ अंशांनी वाढून १५,३६०.२१ अंशांवर बंद झाला. मात्र स्मॉलकॅप या अन्य प्रमुख निर्देशांकामध्ये घट झाली आहे. तो १४,६०५.६९ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये २७.९३ अंशांची घट झाली आहे.सरकारी बॅँकांना भांडवलाचा पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने बॅँकांचे समभाग तेजीत होते. त्याचाच फायदा निर्देशांकांना मिळाला. याच जोडीला घसरलेले खनिज तेलाचे दर आणि मजबूत होत असलेला रुपया यामुळे परकीय वित्तसंस्थांनीही खरेदीचा जोर लावला. डिसेंबर महिन्यात प्रारंभी विक्री करीत असलेल्या या संस्थांनी महिनाभरात ५४.७७ अब्ज रुपयांची खरेदी केली.भारतीय बाजाराने दिली सुमारे ६ टक्के वाढसन २०१८ हे भारतीय भांडवल बाजारासाठी चांगले ठरले आहे. या वर्षात निर्देशांकांनी सुमारे ६ टक्के वाढ दिली आहे. जगातील अन्य बाजारांमध्ये फटका बसत असताना भारतातील देशांतर्गत गुंतवणुकीचा प्रचंड ओघ असल्याने ही वाढ झाली आहे. सेन्सेक्स (३६६९९.५३ ) आणि निफ्टीने (११७३८.५०) या वर्षातच आपल्या सार्वकालीन उच्चांकाची नोंद केली आहे.या वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २०१९.८९ अंशांनी वाढला विशेष म्हणजे त्याने ३५ ते ३८ हजारांचे चार टप्पे ओलांडले. निफ्टी निर्देशांकही ३२९.२० अंशांनी वाढला. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र अनुक्रमे २४६२.१९ आणि ४६२५.०३ अंशांची घट झालेली दिसून आली.परकीय वित्तसंस्थांनी या वर्षामध्ये भारतीय भांडवल बाजारातून ८२५ अब्ज रुपये काढून घेतले. मात्र देशांतर्गत गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली.
जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स पुन्हा गेला ३६ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 3:41 AM