Lokmat Money > बिझनेस न्यूज > नफा वसुलीचा फटका बसल्याने सेन्सेक्स, निफ्टी यांची घसरगुंडी

नफा वसुलीचा फटका बसल्याने सेन्सेक्स, निफ्टी यांची घसरगुंडी

सोमवारी शेअर बाजारांनी १० वर्षांतील सर्वोच्च एकदिवसीय कामगिरी केली होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 04:42 AM2019-05-22T04:42:42+5:302019-05-22T04:42:44+5:30

सोमवारी शेअर बाजारांनी १० वर्षांतील सर्वोच्च एकदिवसीय कामगिरी केली होती.

Sensex and Nifty fall due to profit-booking | नफा वसुलीचा फटका बसल्याने सेन्सेक्स, निफ्टी यांची घसरगुंडी

नफा वसुलीचा फटका बसल्याने सेन्सेक्स, निफ्टी यांची घसरगुंडी

मुंबई : सोमवारच्या अभूतपूर्व तेजीनंतर मंगळवारी गुंतवणूकदारांनी जोरदार नफा वसुली केल्यामुळे शेअर बाजारांनी यू-टर्न घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८३ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११९ अंकांनी आपटला.


सोमवारी शेअर बाजारांनी १० वर्षांतील सर्वोच्च एकदिवसीय कामगिरी केली होती. सेन्सेक्स १,४२२ अंकांनी, तर निफ्टी ४२१ अंकांनी वाढला होता. टक्केवारीच्या हिशेबाने ही मागील सहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. मंगळवारी मात्र बाजार उंचावरून खाली आले. वास्तविक सकाळी बाजार तेजीसह उघडले होते. तथापि, नंतर विक्रीचा मारा झाल्याने निर्देशांकांची घसरगुंडी झाली. वाहन, दूरसंचार, धातू, तंत्रज्ञान आणि बँकिंग या क्षेत्रांत जोरदार विक्री झाली.


सेन्सेक्समधील टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक ७.०५ टक्क्यांनी घसरले. घसरण झालेल्या अन्य कंपन्यांत मारुती, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रीड, एसबीआय आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे. आरआयएल, एचयूएल आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र १.०८ टक्क्यांपर्यंत वाढले.


३० कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ३८२.८७ अंकांनी घसरून ३८,९६९.८० अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११९.१५ अंकांनी घसरून ११,७०९.१० अंकावर बंद झाला. बीएसई मीडकॅप आणि स्मॉलकॅप हे व्यापक आधारावरील निर्देशांकही ०.८४ टक्क्यांपर्यंत घसरले.
मतदानोत्तर चाचण्यांत (एक्झिट पोल) भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे सोमवारी बाजारांत अभूतपूर्व तेजी आली होती. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

...तर निकालानंतरही तेजी कायम राहील
लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलप्रमाणे राहिल्यास निवडणूकपूर्व तेजी निकालानंतरही कायम राहील. आर्थिक सुधारणा आणि मिळकतीतील वाढ याद्वारे घसरगुंडीची जोखीम रोखता येऊ शकते. जागतिक पातळीवरील आर्थिक संकेतही सकारात्मक असल्याचे दिसून येत आहेत.

Web Title: Sensex and Nifty fall due to profit-booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.