मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची भीती व्यक्त होत असल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी सुमारे ४४४ अंकांनी आपटला. २४ जून रोजीच्या ब्रेक्झिट झटक्यानंतरची ही सर्वांत मोठी आपटी असून, निर्देशांक २ आठवड्यांच्या नीचांकावर गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,८00 अंकांच्या खाली आला आहे.
सेन्सेक्स सकाळी नरमाईनेच उघडला होता. काही चढ-उतारानंतर सत्राच्या अखेरीस तो २८,३५३.५४ अंकांवर बंद झाला. ४४३.७१ अंकांची घसरण त्याने नोंदविली. ब्रिटिश जनतेने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याचा कौल सार्वमतात दिल्यानंतर २४ जून रोजी जगभरातील बाजार कोसळले होते.
या धक्क्यात सेन्सेक्सही ६0४.५१ अंकांनी घसरला होता. त्यानंतरची सर्वांत मोठी घसरण आज पाहायला मिळाली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी १५१.१0 अंकांची अथवा १.७0 टक्क्यांची घसरण नोंदवून ८,७१५.६0 अंकांवर बंद झाला. मंगळवारी बकरी ईदनिमित्त बाजार बंद राहणार आहे.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २६ कंपन्यांचे समभाग घसरले. त्यात टाटा स्टील, अदाणी पोर्ट्स, एसबीआय, एल अँड टी, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एम अँड एम, हीरो मोटोकॉर्प, बजाज आॅटो, आयटीसी, गेल आणि लुपीन यांचा समावेश आहे. याउलट इन्फोसिस, आरआयएल, विप्रो यांचे समभाग मात्र वाढले.
व्यापक बाजारांतही दबाव राहिला. बीएसई मीडकॅप २.९५ टक्क्यांनी घसरला. ही त्याची सहा महिन्यांतील सर्वाधिक घसरण ठरली. बीएसई स्मॉलकॅप २.३५ टक्क्यांनी घसरला. जागतिक बाजारांतही घसरगुंडीचाच कल दिसून
आला. हाँगकाँग, सिंगापूर आणि शांघाय हे आशियाई बाजार ३.३६ टक्क्यांपर्यंत घसरले. युरोपीय बाजारांत सकाळी नरमाईचाच कल दिसून आला. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार २ टक्क्यांपर्यंत खाली चालले होते. (प्रतिनिधी)
फेडरलमुळे सेन्सेक्स आपटला
अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची भीती व्यक्त होत असल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी सुमारे ४४४ अंकांनी आपटला
By admin | Published: September 13, 2016 04:23 AM2016-09-13T04:23:22+5:302016-09-13T04:23:22+5:30