मुंबई : सलग ७ दिवस तेजी साजरी करणारा शेअर बाजार शुक्रवारी कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३0.८६ अंकांनी खाली येऊन २९,२३१.४१ अंकांवर बंद झाला. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आरआयएलसह अनेक ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जोर राहिल्याने बाजार घसरला. जागतिक पातळीवरही मंदीची चाल दिसून आली. आशियाई बाजार मात्र तेजीने बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २९,४४६.२१ अंकांवर मंदीनेच उघडला. त्यानंतर तो २९,४६२.0९ ते २९,१७८.२६ अंकांच्या मध्ये खालीवर होत राहिला. सत्र अखेरीस तो २९,२३१.४१ अंकांवर बंद झाला. २३0.८६ अंक अथवा 0.७८ टक्क्यांची घट सेन्सेक्सने नोंदविली. गेल्या सात सत्रांत सेन्सेक्सने १,२३४.८८ अंकांची वाढ मिळविली होती. ही वाढ ४.३७ टक्के आहे. सलग सात दिवसांच्या तेजीनंतर व्यापाऱ्यांत सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातून नफा वसुलीचे सत्र सुरू झाले आणि बाजार खाली आला. ५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१.७0 अंकांनी अथवा 0.६९ अंकांनी घसरून ८,८३३.६0 अंकांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांवर विक्रीचा दबाव सर्वाधिक राहिला. कंपनीचे समभाग ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. तेल मंत्रालयात हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या आरोपींत कंपनीचा एक कर्मचारी असल्यामुळे कंपनीचे समभाग घसरल्याचे सांगण्यात आले. सेन्सेक्सच्या एकूण घसरणीत रिलायन्सचा वाटा ५७.२१ अंकांचा आहे. याशिवाय सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, एलअँडटी, टाटा पॉवर, भारती एअरटेल, विप्रो, मारुती आणि सिप्ला या बड्या कंपन्यांतही मोठी घसरण पाहायला मिळाली. स्पाईसजेटच्या समभागांना मात्र नवी संजीवनी मिळाली. हा समभाग जवळपास २0 टक्क्यांनी वर चढला. कंपनीचे मूळ मालक अजय सिंग यांनी स्पाईसजेट पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. त्यांच्या मालकीला सीसीआयने मंजुरी दिली. त्याचा परिणाम होऊन स्पाईसजेटचा समभाग वाढला. भेल आणि आयटीसीचे समभागही तेजीत होते. तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांतून १,५४२.७0 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मात्र १९५.७४ कोटी रुपयांच्या समभागांनी विक्री केली. शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली. (वृत्तसंस्था)युरोपातील फ्रान्स आणि जर्मनीचे बाजार 0.२0 टक्के ते 0.२४ टक्के घसरले. या उलट ब्रिटनचा एफटीएसई-१0 मात्र वर चढला. जपानचा निक्केई २२५ अंकांनी अथवा 0.३७ टक्क्यांनी वाढला. निक्केईने १५ वर्षांच्या इंट्रा-डे वाढीचा विक्रम केला आहे. चीनचे बाजार चंद्र वर्षाच्या सुटीमुळे बंद होते. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. केवळ ७ कंपन्यांचे समभाग वर चढले. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,५00 कंपन्यांचे समभाग ग्रीन झोनमध्ये, तर १,४२३ कंपन्यांचे समभाग रेड झोनमध्ये राहिले. १0९ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घटून ३,७१५.६३ कोटींवर आली. काल ती ३,८७६.१२ कोटी होती.
सात दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्स आपटला
By admin | Published: February 21, 2015 2:46 AM