मुंबई : भारतीय शेअर बाजारांत सोमवारी सलग सातव्या सत्रात घसरण झाली. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीची सरशी होणार असल्याच्या अंदाजाचा धसका बसल्याने बाजार घसरल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९0.५२ अंकांनी घसरून २८,२२७.३९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३४.७0 अंकांनी घसरून ८,५२६.३५ अंकांवर बंद झाला. दिल्ली विधानसभेत भाजपची पीछेहाट हे बाजाराच्या घसरणीचे मुख्य कारण असले तरी इतरही काही कारणांनी घसरणीला हातभार लावला. डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि डिसेंबरला संपलेल्या तिमाहीतील कंपन्यांची असमाधानकारक कामगिरी ही आणखी काही कारणे आहेत. याशिवाय जागतिक बाजारातील कमजोरी आणि नफा वसुली याचाही फटका बाजारांना बसला. आजच्या घसरणीचा भांडवली वस्तू, धातू, आॅटो, बँकिंग, टिकाऊ वस्तू, एफएमसीजी आणि रिफायनरी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग खाली आले. बाजारात सकाळपासून नकारात्मक वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी घसरणीसह २८,५६६.५0 अंकांवर उघडला. त्यानंतर तो आणखी घसरून २८,१८३.३२ अंकांवर गेला. सत्रअखेरीस २८,२२७.३९ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने ४९0.५२ अंकांची अथवा १.७१ टक्क्यांची घसरण नोंदविली. १६ जानेवारीनंतरची ही सर्वांत खालची पातळी ठरली आहे. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सीएनएक्स निफ्टी १३४.७0 अंकांनी अथवा १.५६ टक्क्यांनी घसरून ८,५२६.३५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स आपटला...!
By admin | Published: February 09, 2015 11:58 PM