मुंबई : नोव्हेंबर महिन्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात कोरोना संकट गहिरे झाल्याचा परिणाम मुंबई बाजारातील शेअर बाजारावर दिसून आला. कोरोनाच्या धसक्याने विक्रीचा सपाटा कायम असून, मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक तब्बल एक हजार अंकांनी गडगडला. (sensex crashes over 1000 points and nifty slips below 14700)
महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात खरबदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी लॉकडाउन आणि नाइट कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीने बाजारात चौफेर विक्री सुरू झाली आणि सोमवारी सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला तर निफ्टी २८० अंकांनी कोसळला. बाजार सुरू झाल्यापासूनच विक्रीचा दबाव असल्याचे पाहायला मिळाले, असे सांगितले जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार १७ अंकांच्या घसरणीसह ४९ हजार ८६८.९२ अंकांवर आला आहे. तर निफ्टी निर्देशांक २७२ अंकांच्या घसरणीसह १४ हजार ७१०.२५ अंकांवर आला आहे.
निर्देशांक ५० हजारांखाली
आयटी, बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने निर्देशांकात १००० अंकांहून अधिक घसरण झाली. यामुळे निर्देशांक ५० हजारांच्या पातळीहून खाली आला. निर्देशांकातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे किमान २.६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. कंपन्यांचे बाजार भांडवल २०३ लाख कोटींवरुन २०१ लाख कोटी झाले आहे.
केवळ तीन कंपन्यांचे शेअर्स तेजीत
मुंबई शेअर बाजारात ३० पैकी २७ शेअर घसरले आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, एचयूएल, नेस्ले, टायटन, इन्फोसिस, बजाज फायनान्स, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एसबीआय, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, या शेअरचा समावेश आहे. शेअर बाजारातील ओएनजीसी, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या केवळ तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.
दरम्यान, पीएनबी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झालेली दिसली.