मुंबई : जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतर मंगळवारी सेन्सेक्समध्ये ११३१ अंकांची वाढ झाली. वाढीनंतर सेन्सेक्स ७५,३०१ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ३२५ अंकांनी वाढून २२,८३४ अंकांवर स्थिरावला. बीएसईमधील ३० पैकी २६ शेअर्स मध्ये वाढ झाली. झोमॅटोमध्ये सर्वाधिक ७.४३ टक्के वाढ झाली. सेक्टोरल इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढ मीडियामध्ये ३.६२ टक्के झाली. रिअल्टीमध्ये ३.१६ टक्के, ऑटो २.३८ टक्के, सरकारी बँका २.२९ टक्के आणि मेटलमध्ये २.१३ टक्के वाढ झाली.
बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती ७.०६ लाख कोटींनी वाढली आहे. मंगळवारी लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३९९.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
बाजारात तेजी कशामुळे?
सकारात्मक संकेत : सोमवारी अमेरिकेचा डाऊ जोन्स ०.८५ टक्के वाढून ४१,८४१ अंकांवर बंद झाला. नॅस्डॅक कंपोजिट ०.३१ टक्के वाढला. आशियाई बाजारांमध्ये जपानच्या निक्केई १.४६ टक्के, तर हाँगकाँगच्या हेंगसेंग इंडेक्समध्ये १.७५ टक्के वाढ झाली.
खरेदीची लाट : ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर बाजारात सुधारणा दिसत आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स स्वस्त मिळत असल्याने गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात सर्व १९ सेक्टोरल इंडेक्स हिरव्या मार्कमध्ये व्यवहार करत होते. ऑटो, सरकारी बँक आणि रिअल्टी इंडेक्स २ टक्के वाढले. आयटी, फार्मा इंडेक्स १ टक्का वाढले.
ट्रेडवॉरमुळे कोरोना, मंदीपेक्षा अधिक भीती
व्यापार युद्ध तीव्र होण्याच्या भीतीमुळे परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शेअर बाजारातून चालू वर्षात विक्रमी पैसे काढले. गुंतवणूकदारांनी कोरोना काळातील मोठी घसरण आणि २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीला देखील मागे टाकले आहे.
हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी १३ दिवस उरले असताना गुंतवणूकदारांनी बाजारातील १.५३ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. चालू कॅलेंडर वर्षात जानेवारीपासून आत्तापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी १.४३ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. याआधी परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सर्वात मोठी गुंतवणूक विक्री २०२१-२२ मध्ये करीत १.४० लाख कोटी रुपये बाजारातून काढले होते.