मुंबई : कारखाना उत्पादनात झालेली घट, तसेच किरकोळ आणि ठोक अशा दोन्ही क्षेत्रांत झालेली पिछेहाट यामुळे मंगळवारी सेन्सेक्स सुमारे ८८ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे ३0 अंकांनी घसरला. सकाळी सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर विक्रीचा मारा झाल्याने त्यात घसरण झाली. सत्राच्या अखेरीस ८७.७९ अंकांनी अथवा 0.३१ टक्क्याने घसरून, तो २८,0६४.६१ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ३७७.५२ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २९.६0 अंकांनी अथवा 0.३४ टक्क्याने घसरून ८,६४२.५५ अंकांवर बंद झाला. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी युनिटेकचा समभाग १६.९१ टक्क्यांनी घसरला. नोएडा आणि गुरगाव येथील दोन प्रलंबित प्रकल्पात घरे खरेदी करणाऱ्यांना पैसे परत करण्यास असमर्थ असल्याचे कंपनीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे कंपनीचा समभाग गडगडला. जागतिक बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. जपानचा बाजार १.६२ टक्क्यांनी घसरला. चीन, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरीया आणि तैवान येथील बाजार 0.0९ टक्का ते 0.४९ टक्का घसरले. युरोपीय बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन येथील बाजार 0.0४ टक्का ते 0.१३ टक्का खाली आले. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स घसरला
By admin | Published: August 17, 2016 4:26 AM