मुंबई, दि. 11 - मागच्या काही दिवसांपासून सातत्याने उसळी घेत असलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात शुक्रवारी मोठी घसरण झाली. सकाळी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्समध्ये 300 पेक्षा जास्त तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्वाच्या व्याजदरात कपात घोषित केल्यापासून बाजारात एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे.
शेअर बाजाराचे नियमन करणा-या सेबीने ३३१ संशयित शेल कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याचे दिलेले आदेश हा सुद्धा गुंतवणूकदारांसाठी एक धक्का आहे. चार दिवसात सेन्सेक्समध्ये 1 हजार अंकांची घसरण झाली आहे तसेच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मुल्यामध्येही घसरण झाली आहे.अमेरिका आणि उत्तरकोरियामध्ये वाढत चाललेल्या तणावाचेही जागतिक शेअर बाजारांमध्ये नकारात्मक पडसाद उमटत आहेत. गुरुवारी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांनी घसरण झाली. फार्मा कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण झाली होती.
३३१ शेल कंपन्यांविरुद्ध कारवाईचे आदेश
दोन दिवसांपूर्वी कंपनी व्यवहार मंत्रालयाने ३३१ संशयित शेल कंपन्यांची एक यादी जारी केली. त्यानुसार सेबीने कारवाईचे आदेश दिले. या कंपन्यांची नोंदणीही रद्द होऊ शकते. त्यांचे समभाग नजरेखाली ठेवण्यात येतील. गरज भासल्यास स्वतंत्रपणे ऑडिट होईल. कदाचित फोरेन्सिक ऑडिटही केले जाऊ शकते.
मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार आणि मेट्रोपोलिटन शेअर बाजार यांना पाठविलेल्या पत्रात सेबीने म्हटले आहे आहे की, ‘या ३३१ कंपन्यांचे समभाग तात्काळ ग्रेडेड सर्व्हेइलन्स मेकॅनिझम (जीएसएम) या यंत्रणेच्या ‘स्टेज फोर’मध्ये ठेवण्यात यावेत.’ समभागांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. स्टेज फोरमध्ये ठेवलेल्या समभागांना महिन्यातून एकदाच ट्रेड टू ट्रेड श्रेणीत व्यवसायास परवानगी मिळते. त्यामुळे हे समभाग या महिन्यात व्यवसायासाठी उपलब्ध नसतील.सेबीने म्हटले आहे की, या कंपन्यांचे समभाग प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारीच फक्त व्यवसायास खुले असतील. याचाच अर्थ आता या महिन्यात ते व्यवसायासाठी खुले असणार नाहीत.