नवी दिल्ली : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १८९ अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली आला. देशाच्या निर्यातीत घट झाल्याचा फटका बाजाराला बसला आहे. वस्तू आणि सेवाकराचे विधेयक संसदेच्या मान्सून सत्रात मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळेही बाजारात थोडी निराशा असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ५५0.0५ अंकांनी वाढला होता. सोमवारी बँकिंग क्षेत्राचे समभाग प्रकाशझोतात असल्याचे दिसून आले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने विविध प्रकारच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकांच्या समभागांनी मोठी झेप घेतली. बँक आॅफ बडोदाचा समभाग १५.१५ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल कॅनरा बँकेचा समभाग १३.४२ टक्के, बँक आॅफ इंडिया ८.७२ टक्के, पंजाब नॅशनल बँक ४.0९ टक्के आणि एसबीआयचा समभाग ३.९५ टक्के वाढला. भारताच्या निर्यातीत जुलैमध्ये १0.३ टक्क्यांची घट झाली आहे. ही सलग आठव्या महिन्यातील घट ठरली आहे. जुलैत भारताची निर्यात घसरून २३.१३ अब्ज डॉलरवर आली. त्याबरोबर भारताची व्यापारी तूट १२.८१ अब्जावर पोहोचली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. एका क्षणी तो २८,0९५.९७ अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर मात्र तो नकारात्मक झोनमध्ये गेला. विक्रीचा मारा झाल्यामुळे एका क्षणी तो २७,७३९.१३ अंकांपर्यंत खाली घसरला. सत्राच्या अखेरीस थोडा सुधारला. तथापि, १८९.0४ अंकांनी अथवा 0.६७ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,८७८.२७ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५00 अंकांच्या खाली आला. ४१.२५ अंकांची अथवा 0.४८ टक्क्यांची घसरण होऊन निफ्टी ८,४७७.३0 अंकांवर बंद झाला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टीला सर्वाधिक १.२८ टक्क्यांचा फटका बसला. त्यापाठोपाठ भांडवली वस्तू, तेल आणि गॅस, वाहन, ऊर्जा, एफएमसीजी आणि आयटी या क्षेत्रांना घसरण सोसावी लागली. जागतिक बाजारांपैकी आशियाई बाजारांत संमिश्र कल राहिला. शांघाय कंपोजिट 0.७१ टक्क्यांनी वाढला. अन्य महत्त्वाच्या बाजारांत घसरण पाहायला मिळाली. युरोपीय बाजारांत सकाळी जैसे थे स्थिती पाहायला मिळाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या खाली
By admin | Published: August 17, 2015 11:21 PM