Join us

३१८ अंकांनी घसरला सेन्सेक्स

By admin | Published: January 16, 2016 2:22 AM

कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१७.९३ अंकांनी घसरून २४,४५५.0४ अंकांवर बंद झाला.

मुंबई : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१७.९३ अंकांनी घसरून २४,४५५.0४ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा १९ महिन्यांचा नीचांक ठरला आहे. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५00 अंकांच्या खाली उतरला आहे.या आठवड्यात सेन्सेक्स ४७९.२९ अंकांनी अथवा १.९२ टक्क्यांनी, तर निफ्टी १६३.५५ अंकांनी अथवा २.१५ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या आठवड्यात हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ४.६८ टक्के आणि ४.५६ टक्के घसरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ३0 डॉलरपेक्षा खाली आले आहेत, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाही ६७.७0 वर आला आहे. रुपयाची ही २९ महिन्यांची नीचांकी पातळी ठरली आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात घसरण पाहायला मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर ही तेजी टिकू शकली नाही. सत्राच्या अखेरीस ३१७.९३ अंकांची अथवा १.२८ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २४,४५५.0४ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ८१.१४ अंकांनी घसरला होता. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ९९ अंकांनी अथवा १.३१ टक्क्यांनी घसरून ७,४३७.८0 अंकांवर बंद झाला. रिअल्टी, बँकिंग, पीएसयू, इन्फ्रा, कॅपिटल गुडस् आणि मेटल या क्षेत्रातील घसरणीचा फटका निर्देशांकांना बसला. हिंदुस्तान युनिलिव्हरचा नफा २२ टक्क्यांनी घसरून ९७१.४0 कोटींवर आल्यामुळे गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे कंपनीचा समभाग २.७0 टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २५ कंपन्यांचे समभाग घसरले. गेलचा समभाग सर्वाधिक ६.0१ टक्का घसरला. त्याखालोखाल एसबीआयचा समभाग ५.६४ टक्के घसरला. (वृत्तसंस्था)