मुंबई - अर्थसंकल्प सादर होण्याआधी नवनवीन उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र गंटागळया खात आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 450 अंकांची घसरण झाली आणि 34,616 अंकांवर बाजार उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 150 अंकांची घट झाली. बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 58 अंकांची घट होऊन 35,906 अंकांवर तर निफ्टी 11,016 अंकांवर बंद झाला होता.
शुक्रवारी सेन्सेक्सला एकाच दिवसात ८४० व्होल्टचा अर्थात अंकांचा शॉक बसला. गेल्या अडीच वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण ठरली. विक्रीचा भडीमार सुरू राहिल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १०,८०० अंकांखाली उतरला. गुंतवणूदारांकडील शेअर्सचे मूल्य एकाच दिवसांत ४.६ लाख कोटी रूपयांनी कमी झाले. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सअंतर्गत असलेल्या ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांच्या शेअर्स घसरले.
बजेटआधी सेन्सेक्सने ३६ हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र अरूण जेटली यांनी दीर्घकालिन भांडवली नफ्यावर १० टक्के कर लावला. याशिवाय म्युच्युअल फंडाच्या लाभांशावरही कर लादला गेल्याने बाजाराची घोर निराशा झाली. यामुळे बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले.