मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार विक्री यामुळे मंगळवारी शेअर बाजारांत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४ अंकांनी घसरून २५,७७५.७४ अंकांवर बंद झाला. नोव्हेंबरमधील डेरिव्हेटिव्ह सौद्यांची मुदत संपत आली आहे. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. याशिवाय बुधवारी गुरुनानक जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सतर्क राहणे पसंत केले. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने ९२.९५ अंक गमावले आहेत. ब्रोकरांनी सांगितले की, यंदाच्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत काही ब्ल्यू चीप कंपन्यांची कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. त्यामुळे बाजारात तसेही निराशाजनक वातावरण आहे. त्यातच आता अन्य कारणांची भर पडल्याने बाजारात नरमाईचा कल दिसून येत आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स सकाळी नकारात्मक वातावरणात उघडला होता. त्यानंतर रिअल्टी, आॅईल अँड गॅस आणि पीएसयू या क्षेत्रातील खरेदीचे बळ मिळाल्यामुळे त्यात सुधारणा झाली. तथापि, सत्राच्या अखेरीस तो ४३.६0 अंकांनी अथवा 0.१७ टक्क्यांनी घसरून २५,७७५.७४ अंकांवर बंद झाला.व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७.६५ अंकांनी अथवा 0.२२ टक्क्यांनी घसरून ७,८३१.६0 अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, तो दिवसभर ७,८१२.६५ आणि ७,८७0.३५ अंकांच्या दरम्यान खालीवर होताना दिसत होता.क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स सर्वाधिक १.२0 टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल आॅटो, आयटी, हेल्थकेअर आणि कंझुमर ड्युरेबल्स यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारांत मात्र अधिक चांगला कल पाहायला मिळाला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.३३ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.0८ टक्क्यांनी वाढला. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे समभाग ९.२९ टक्क्यांनी वाढून ७१.१५ रुपयांवर गेले. सकारात्मक कॉर्पोरेट रिपोर्टचा अंदाज वर्तविण्यात आल्याचा लाभ कंपनीला मिळाला.
विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स घसरला
By admin | Published: November 24, 2015 11:43 PM