मुंबई : नफावसुलीचा फटका बसल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरला. सकाळी चांगली सुरुवात होऊनही सेन्सेक्सला लाभ झाला नाही. सत्राच्या अखेरीस तो १९ अंकांनी खाली आला.
जागतिक पातळीवरील घडामोडीही सेन्सेक्सच्या घसरणीस कारभीतूत झाल्या. चिनी बाजारांत मोठी घसरण पाहायला मिळाली. शांघाय कंपोजिट ३.0६ टक्क्यांनी खाली आला.
सेन्सेक्सने सकाळी चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर तो २७,४४५.२४ अंकांपर्यंत वर चढला होता. हीरो मोटोकॉर्पच्या दुसऱ्या तिमाहीतील कमाईचा लाभ त्याला मिळत होता. तथापि, नंतर ही वाढ कायम ठेवण्यास बाजाराला अपयश आले. नफावसुलीचे सत्र सुरू झाल्याने बाजार खाली आला. सत्राच्या अखेरीस २७,२८७.६६ अंकांवर बंद झाला. १९.१७ अंक अथवा 0.0७ टक्क्यांची घसरण सेन्सेक्सने नोंदविली.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ९.९५ अंकांनी अथवा 0.१२ टक्क्यांनी घसरून ८,२५१.७0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १३ कंपन्यांचे समभाग घसरले. १७ कंपन्यांचे समभाग वाढले. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी डॉ. रेड्डीजचा समभाग सर्वाधिक ३.३0 टक्क्यांनी खाली आला. त्यापाठोपाठ एसबीआयचा समभाग १.८७ टक्क्यांनी घसरला. याशिवाय एचडीएफसी बँकेचा समभाग 0.0३ टक्क्यांनी घसरला. खरे म्हणजे सप्टेंबर महिन्यात बँकेच्या नफ्यात २0.५ टक्के वाढ झाली आहे. २,८६९.५ कोटी रुपयांचा नफा बँकेने कमावला तरीही बँकेचा समभाग घसरला.
घसरणीचा फटका बसलेल्या अन्य कंपन्यांत भेल, गेल, एलअँडटी, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, लुपीन, टाटा मोटर्स आणि आरआयएल यांचा समावेश आहे. समभागांत वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांमध्ये वेदांता, टाटा स्टील, हिंदाल्को, बजाज आॅटो, भारती एअरटेल, एनटीपीसी, इन्फोसिस, विप्रो आणि एमअँडएम यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
नफावसुलीमुळे सेन्सेक्स घसरला
नफावसुलीचा फटका बसल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरला. सकाळी चांगली सुरुवात होऊनही सेन्सेक्सला लाभ झाला नाही.
By admin | Published: October 22, 2015 03:33 AM2015-10-22T03:33:36+5:302015-10-22T03:33:36+5:30