Join us

विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्स घसरला

By admin | Published: August 23, 2016 5:31 AM

शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली.

मुंबई : शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ९१ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुमारे ३८ अंकांनी खाली आला. खरे म्हणजे बाजार सकाळी तेजीत होता. सेन्सेक्स वाढीसह उघडला होता. नंतर तो आणखी वरही चढला होता. तथापि, ब्ल्यूचीप कंपन्यांत विक्रीचा मारा सुरू झाल्याने तो खाली आला. मिळविलेली सर्व वाढ त्याने गमावली. सत्राच्या अखेरीस ९१.४६ अंकांची अथवा 0.३३ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,९८५.५४ अंकांवर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स ४६.४४ अंकांनी घसरला होता. निफ्टी ३७.७५ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी घसरून ८,६२९.१५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरलेल्या कंपन्यांत लुपीन, टीसीएस, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, मारुती सुझुकी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, ओएनजीसी, विप्रो, एमअँडएम, अदाणी पोर्ट्स आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. हिंद युनिलिव्हर, आयटीसी, एचडीएफसी, कोल इंडिया, सिप्ला, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, एलअँडटी, गेल आणि डॉ. रेड्डीज यांचे समभाग मात्र वाढले. (प्रतिनिधी)