Join us

सेन्सेक्स १0६ अंकांनी घसरला

By admin | Published: July 16, 2016 3:00 AM

इन्फोसिसने आपल्या वृद्धीदरात घट केल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0६ अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली आला.

मुंबई : इन्फोसिसने आपल्या वृद्धीदरात घट केल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0६ अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली आला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स ७0९.६0 अंकांनी अथवा २.६१ टक्क्यांनी वाढला आहे, तसेच एनएसई निफ्टीही २१८.२0 अंकांनी अथवा २.६२ टक्क्यांनी वाढला. इन्फोसिसने आपल्या वार्षिक महसुलातील वृद्धीदरात १0.५ टक्के ते १२ टक्के घट होईल, असा नवा अंदाज दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या वार्षिक महसुलात तब्बल ८.८१ टक्के अथवा १,0७२.२५ कोटी रुपयांची घट होणार आहे. वास्तविक जूनमध्ये कंपनीचा नफा वाढला आहे. तरीही कंपनीची एकूण कामगिरी घसरण्याचे संकेत आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सॉफ्टवेअर कंपन्यांना याचा विशेष फटका बसला. बीएसई आयटी निर्देशांक ५.३५ टक्क्यांनी घसरला. टेक्नॉलॉजी निर्देशांकही ३.९४ टक्क्यांनी खाली आला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १0५.६१ अंकांनी अथवा 0.३८ टक्क्याने घसरून २७,८३६.५0 अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी २३.६0 अंकांनी अथवा 0.२८ टक्क्याने घसरून ८,५४१.४0 अंकांवर बंद झाला.