मुंबई : मुडीजने भारताच्या वाढीच्या अनुमानित दरात घट केल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७ अंकांनी घसरून २७,८३१.५४ अंकांवर बंद झाला. एचडीएफसी, लुपीन आणि सन फार्मा या ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जोर दिसून आला. चिनी शेअर बाजारात आज तीव्र करेक्शन कार्यरत राहिले. त्याचाही फटका भारतीय बाजारांना बसला. मुंबई शेअर बाजाराचा धातू निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला. चीनची अर्थव्यवस्था गती गमावीत असल्याच्या भीतीमुळे हा फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.भारतातील आर्थिक सुधारणांच्या मंद गतीमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा रुतण्याची भीती मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने व्यक्त केली आहे. त्याबरोबर मूडीजने भारताच्या वाढीचा अनुमानित दर ७.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला आहे. पावसाचे कमी प्रमाण हेही एक कारण अंदाज घटविण्यामागे असल्याचे मूडीजने म्हटले आहे. जागतिक बाजारात नरमाईचे वातावरण पाहायला मिळाले. आशियाई बाजारांत मोठी घसरण झाली. शांघाय कंपोजिट तब्बल ६.१५ टक्क्यांनी घसरला. गेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीतील ही सर्वांत मोठी घसरण ठरली. युरोपीय शेअर बाजारांतही सकाळी नरमाईचाच कल दिसून आला.खरे म्हणजे सेन्सेक्सने सकाळी चांगली सुरुवात केली होती. तेजीने उघडून त्याने २८ हजार अंकांचा टप्पा गाठला होता. दुपारच्या सत्रात मात्र सेन्सेक्स घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस तो २७,८३१.५४ अंकांवर बंद झाला. ४६.७३ अंकांची अथवा 0.१७ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा व्यापक आधारावरील निफ्टी १0.७५ अंकांनी अथवा 0.१३ टक्क्यांनी घसरला. सत्राच्या अखेरीस तो ८,४६६.५५ अंकांवर बंद झाला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई मेटल इंडेक्स सर्वाधिक १.९२ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल पीएसयू, रिअल्टी, बँकिंग आणि ऊर्जा या क्षेत्रांचे निर्देशांक घसरले. व्यापक बाजारांचे स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक 0.८५ टक्क्यांपर्यंत खाली आले.
सेन्सेक्स ४७ अंकांनी घसरला
By admin | Published: August 18, 2015 10:11 PM