मुंबई : पूर्वलक्षी प्रभावाने करवसुली, कंपन्यांच्या कामगिरीचे निरुत्साही निष्कर्ष आणि रुपयाच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही घसरणीचे सत्र सुरू राहिले. सेन्सेक्स २१०.१७ अंकांनी घसरून २७,६७६.०४ अंकावर आला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातही फारसे उत्साहवर्धक वातावरण नव्हते. निफ्टी ८,४०० अंकांखाली बंद झाला. सन फार्माच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. जपानी कंपनी दाईची सँक्योने सन फार्मातील आपली भागीदारी विकण्याची घोषणा केल्यामुळे सेन्सेक्स व निफ्टीत कंपनीचे शेअर ८.७० टक्क्यांनी घसरले. पूर्वलक्षी प्रभावाने करवसुलीवरून विदेशी गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एका आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी १५०६.८६ कोटी रुपयांचे शेअर विकले. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअरचा सेन्सेक्स आज २७,८६०.५१ अंकावर उघडला. सुरुवात कमकुवत झाली असली तरी व्यवहारादरम्यान एकवेळ तो २७,९७६.९३ अंकांवर गेला होता. हा त्याचा आजचा उच्चांक होता. बड्या कंपन्यांच्या शेअरची अखेरच्या तासांत मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे एकवेळ सेन्सेक्स २७,५९८.२१ अंशांहून खाली गेला होता. अखेरीस तो २०१.१७ अंक म्हणजेच ०.८३ टक्क्यांच्या नुकसानीसह २७,६७६.०४ अंकावर बंद झाला. हा त्याचा २७ मार्चनंतरचा नीचांक आहे. याचप्रकारे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७०.३५ अंक किंवा ०.८३ टक्क्यांच्या नुकसानीसह ८,४०० हून खाली ८,३७७.७५ अंकावर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ८३५२.७० ते ८४६९.३५ अंकादरम्यान झुलत राहिला. विविध वर्गातील निर्देशांकात आरोग्य सेवेत सर्वाधिक ३.२४ टक्क्यांची घसरण झाली. वाहन क्षेत्रात १.३१ टक्के, तेल आणि नैसर्गिक वायू १.०८ टक्के, वीज क्षेत्रात ०.७३, भांडवली साहित्य ०.४८ टक्के, मालमत्ता क्षेत्रात ०.३७ टक्के एवढी घट झाली.
सेन्सेक्स पाचव्या दिवशीही घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2015 2:54 AM