Join us  

सेन्सेक्स पोेहोचला १४ महिन्यांच्या नीचांकावर

By admin | Published: September 04, 2015 10:14 PM

भारतातील शेअर बाजारांत शुक्रवारी पुन्हा एकदा प्रचंड मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५६२.८८ अंकांनी घसरून १४ महिन्यांच्या नीचांकावर गेला.

मुंबई : भारतातील शेअर बाजारांत शुक्रवारी पुन्हा एकदा प्रचंड मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५६२.८८ अंकांनी घसरून १४ महिन्यांच्या नीचांकावर गेला. अमेरिकेचा रोजगारविषयक अहवाल प्रसिद्ध होण्याआधी जगभरातील बाजारांत विक्रीचा मारा झाला. त्यामुळे ही घसरण झाली आहे.सेन्सेक्सचा आजचा बंद १४ जुलै २0१४ नंतरचा सर्वाधिक नीचांकी ठरला आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २५,00६.९८ अंकांवर बंद झाला होता. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेतील बिगर शेती रोजगाराची मजबूत आकडेवारीमुळे सप्टेंबर महिन्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह निश्चितपणे व्याजदरांत वाढ करील, असे जाणकारांना वाटते. त्यामुळे जगभरातील बाजारांत घबराटीचे वातावरण आहे. याशिवाय आज डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर झाला. याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारांनी माना टाकल्या.शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्सने १,१९0.४८ अंकांची अथवा ४.५१ टक्क्यांची घसरण नोंदविली आहे. त्याच बरोबर निफ्टी ३४६.९0 अंकांनी अथवा ४.३३ टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने चौथ्यांदा साप्ताहिक घसरण नोंदविली आहे. याशिवाय शुक्रवारी निफ्टी ७,७00 अंकांच्या खाली आला आहे.सेन्सेक्स सकाळपासूनच नकारात्मक झोनमध्ये होता. एका क्षणी तो २५,११९.0५ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस २५,२0१.९0 अंकांवर तो बंद झाला. सेन्सेक्सने ५६२.८८ अंकांची अथवा २.१८ टक्क्यांची घसरण नोंदविली. काल सेन्सेक्स ३११.२२ अंकांनी वाढला होता. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी १६७.९५ अंकांनी अथवा २.१५ टक्क्यांनी घसरून ७,६५५.0५ अंकांवर बंद झाला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टी सर्वाधिक ३.३२ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल इन्फ्रा, ऊर्जा, बँकेक्स, हेल्थकेअर आणि आयटी या क्षेत्राचे निर्देशांक घसरले.