मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतच्या उत्सुकतेमुळे शेअर बाजारात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९ अंकांनी घसरून २६,२६५.२४ अंकांवर बंद झाला.
सकाळी सेन्सेक्स नरमाईनेच उघडला होता. त्यानंतर मात्र तो वर चढला. या टप्प्यावर नफा वसुलीचा जोर वाढल्याने तो पुन्हा घसरला. सत्राच्या अखेरीस ३८.९६ अंकांनी अथवा 0.१५ टक्क्यांनी वाढून २६,२६५.२४ अंकांवर बंद झाला. १ आॅक्टोबरनंतरची ही नीचांकी पातळी ठरली आहे. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ३२५.३५ अंक गमावले आहेत. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुरुवातीला ८000 अंकांच्या वर गेला होता. तथापि, त्याला ही नंतर नफा वसुलीचा फटका बसला. १.१५ अंकांची अथवा 0.0१ टक्क्यांची घसरण नोंदवून तो ७,९५४.३0 अंकांवर बंद झाला.
या आठवड्यात सेन्सेक्सने ३९१.५९ अंक गमावले. ही घसरण १.४६ टक्के आहे. निफ्टीने १११.५0 अंकांनी अथवा १.३८ टक्क्यांनी घसरला. निर्देशांक सलग दुसऱ्या आठवड्यांत घसरले आहेत.
घसरण सोसावी लागलेल्या प्रमुख कंपन्यांत गेल, वेदांता, टाटा मोटर्स, सन फार्मा, भेल, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)