मुंबई
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रुपानं (स्ट्रेन) खळबळ माजली आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर भारतानेही ब्रिटनमधून येणाऱ्या विमान सेवांवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.
ब्रिटनमधील या घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी सेन्सेक्स तब्बल २ हजार अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीत ४०० अंकांची घसरण झाली आहे.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे अवघ्या काही मिनिटांत तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स ४६,९६० अंकांवर बंद झाला होता. त्यात आज सकाळीच २८ अंकांच्या घसरणीने बाजाराची सुरुवात झाली. दुपारपर्यंत सेन्सेक्समध्ये २ हजार रुपयांची घसरण होऊन ४४,९२३ अंकांवर जाऊन पोहोचला आहे. निफ्टीची परिस्थिती देखील वाईट आहे. शुक्रवारी १३,७६० अंकांवर बंद झालेल्या निफ्टीची सुरुवात आज सकाळी १९ अंकांच्या घसरणीने झाली होती. दुपारपर्यंत निफ्टी १३,१३१ इतका खाली कोसळला आहे.
शेअर बाजार कोसळण्याचं कारण काय?
कोरोनाच्या नव्या रुपानं ब्रिटनमध्ये घातलेल्या थैमानामुळे शेअर बाजार पडला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे सर्व बाजार ठप्प पडण्यास सुरुवात झाली आहे. कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणुकदारांनी बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे.