Join us

सेन्सेक्स २२६ अंकांनी कोसळला

By admin | Published: September 26, 2014 5:17 AM

मुंबई शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स २७० अंकांनी कोसळून एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर आला

मुंबई : मुंबई शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स २७० अंकांनी कोसळून एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर आला. सर्वोच्च न्यायालयाने २१४ कोळसा खाणींचे वितरण रद्द केल्यामुळे बाजारात मंदीची लाट आली असून, धातू, वीज आणि बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने टाळला आहे. त्याचा विपरीत परिणाम तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअरवर झाला. याशिवाय सप्टेंबरच्या डेरिव्हेटिव्ह करारांचा अखेरचा दिवस असल्यामुळेही बाजारातील वातावरण सतर्क दिसून आले. त्याचा खरेदीवर प्रतिकूल परिणाम जाणवला. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम होऊन बाजार कोसळला, असे जाणकारांनी सांगितले.मुंबई शेअर बाजाराचा ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह २६,८०८.६६ अंकांवर उघडला होता. नंतर तो २६,८१४.२० अंकांपर्यंत वर चढला होता. जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि मजबूत आर्थिक आकड्यांमुळे बाजार तेजीत होता. नंतर मात्र तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा सुरू झाला. त्यामुळे सेन्सेक्स २६,४६८.३६ अंकांपर्यंत खाली आला. दिवसअखेरीस २७६.३३ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,४६८.३६ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत सेन्सेक्सने १.०३ टक्के घसरण नोंदविली. २६ आॅगस्टनंतरचा सर्वांत खालचा स्तर सेन्सेक्सने गाठला आहे. गेल्या ३ दिवसांतील घसरणीत सेन्सेक्सने ७३० अंक गमावले आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनक्स निफ्टी ९०.५५ अंकांनी म्हणजेच १.१३ टक्क्याने कोसळून ७,९११.८५ अंकावर बंद झाला. व्यवसायादरम्यान निफ्टी ७,८७७.३५ ते ८,०१९.३० अंकांच्या दरम्यान खाली वर होताना दिसून आला. गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यामुळे तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम इतरही कंपन्यांवर झाला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी २३ कंपन्यांचे शेअर्स घसरले. अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, हिंदाल्को, भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि ओएनजीसी या कंपन्यांना घसरणीचा फटका बसला. टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब आणि गेलसह ७ कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले. (प्रतिनिधी)