Join us

सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळला

By admin | Published: September 25, 2014 3:28 AM

सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणींचे वाटप रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणींचे वाटप रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. न्यायालयाचा निर्णय येताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१४ अंकांनी खाली आला होता. मात्र, नंतर तो सावरला. दिवस अखेरीस ताशी ३१ अंकांची घसरण नोंदवून २६,७४४.६९ अंकांवर बंद झाला. रिअल्टी, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि आॅटो क्षेत्राला आजच्या घसरणीचा फटका बसला. एफएमसीजी आणि औषधी क्षेत्र मात्र त्यातून बचावले.बीएसई सेन्सेक्स प्रारंभी तेजीत होता. २६,८४४.७0 अंकांवर तो पोहोचला होता. मात्र, नंतर कोळसा खाणींचे वाटप न्यायालयाने रद्द केल्याची बातमी आली आणि बाजार घसरणीला लागला. थोड्याशा अवधीतच बाजार २१५ अंकांनी घसरला. घबराटीचे हे वातावरण फार काळ टिकले नाही. बाजाराने पुन्हा एकदा तेजीचा मार्ग पकडला. दिवस अखेरीस ३१ अंकांची घसरण नोंदवून तो २६,७४४.६९ अंकांवर बंद झाला. ही घसरण कालच्या तुलनेत 0.१२ टक्के आहे. काल बाजार ४३१ अंकांनी घसरला होता. विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून घेऊ लागले आहेत. काल एफपीआय आणि एफआयआय गुंतवणूकदारांनी १,१८५.१७ कोटी रुपये काढले. त्यामुळे बाजारातील वातावरण फिके दिसून आले. जिंदाल स्टीलचे शेअर्स १0 टक्क्यांनी उतरले. भूषण स्टील, सेल, टाटा स्टील आणि हिंदालको या कंपन्यांनाही मोठा फटका बसला. व्यापक आधार असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी १५.१५ अंकांनी घसरून ८,00२.४0 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.१९ टक्के आहे. एका क्षणी निफ्टी ७,९५0.0५ अंकांपर्यंत खाली आला होता. आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार तेजीत होते, तर जपान आणि सिंगापूर येथील बाजारात मंदीचे वातावरण दिसून आले. युरोपीय बाजारातही घसरणीचा कल दिसून आला. (प्रतिनिधी)