मुंबई : मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७८ अंकांनी घसरून २५,७४३.२६ अंकांवर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्यामुळे बाजार घसरल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपन्यांचे तिमाही निकालही घसरणीला कारणीभूत ठरले. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ४६९.१९ अंकांनी घसरला. त्यानंतर मंगळवारी तो नरमाईनेच उघडला. एका क्षणी तो २५,७0९.२३ अंकांपर्यंत खाली गेला होता. सत्राच्या अखेरीस ३७८.१४ अंकांनी अथवा १.४५ टक्क्यांनी घसरून तो २५,७४३.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८00 अंकांच्या खाली घसरला आहे. १३१.८५ अंकांची अथवा १.६७ टक्क्यांची घसरून सोसून निफ्टी ७,७८३.३५ अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. (वृत्तसंस्था)सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत ओएनजीसी, डॉ. रेड्डीज, आरआयएल, लुपीन, कोल इंडिया, वेदांता, भेल आणि सन फार्मा यांचा समावेश आहे. या घसरणीच्या टप्प्यातही काही कंपन्यांचे समभाग वाढले. लाभ मिळविणाऱ्या या कंपन्यांत मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, बजाज आॅटो, एमअँडएम यांचा समावेश आहे.
सेन्सेक्स ३७८ अंकांनी घसरला, निफ्टीही खाली
By admin | Published: November 10, 2015 10:36 PM