मुंबई : विक्रीचा जोरदार मारा झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी १0८.५२ अंकांनी घसरून २७,२५३.४४ अंकांवर बंद झाला. औषधी क्षेत्रातील बडी कंपनी लुपीनवर विक्रीचा दबाव अधिक राहिला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी असमाधानकारक राहिल्यामुळे हा फटका बसला. दरम्यान, अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी जागतिक बाजारातही घसरण झाल्याने भारतीय बाजारांवर परिणाम दिसून आला.कालही सेन्सेक्स १0९ अंकांनी घसरला होता. आज सकाळी सेन्सेक्स दबावाखाली होता. मंदीसह २७,२९१.0६ अंकांवर उघडल्यानंतर तो आणखी खाली घसरला. सत्राच्या अखेरीस १0८.५२ अंकांनी अथवा 0.४0 टक्क्यांनी घसरून तो २७,२५३.४४ अंकांवर बंद झाला. १६ आॅक्टोबरनंतरची सेन्सेक्सची ही नीचांकी पातळी ठरली आहे. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने २१७.३७ अंकांची घसरण नोंदविली आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग घसरले. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४.0५ अंकांनी अथवा 0.३0 टक्क्यांनी घसरून ८,२३५.४0 अंकांवर बंद झाला. दुसऱ्या तिमाहीत लुपीनचा नफा ३५.११ टक्क्यांनी घसरून ४0८.८0 कोटींवर आला आहे. त्याचा फटका बसल्याने लुपीन सेन्सेक्समधील सर्वाधिक ५ टक्के घसरण झालेली कंपनी ठरली आहे.या उलट चांगल्या कामगिरीच्या बळावर मारुती सुझुकी सर्वाधिक तेजीत असलेली कंपनी ठरली. मारुतीचा नफा ४२.१ टक्क्यांनी वाढून १,२२५.६ कोटी रुपये झालाआहे.
विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला
By admin | Published: October 27, 2015 11:19 PM