शेअर बाजार : दिवसभरातील अस्थिरतेनंतर शुक्रवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८८ अंकांनी वाढून २७,६६१.४0 अंकांवर बंद झाला. औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजारात खरेदी झाल्याने निर्देशांक वाढीने बंद झाला. ग्रीसने नवे बचाव पॅकेज सादर केल्याने युरोपातील संकटावर तोडगा दृष्टिपथात आला. त्यामुळे बाजारात तेजीने प्रवेश केल्याचे सूत्रांनी सांगितले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स दिवसभर उतार-चढाव दर्शवीत होता. २७,७२९.४६ आणि २७,५३0.९0 अंकांच्या मध्ये तो हिंदकाळत होता. सत्राच्या अखेरीस ८७.७४ अंकांची अथवा 0.३२ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,६६१.४0 अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा व्यापक आधारावरील निफ्टी ३२ अंकांनी अथवा 0.३८ टक्क्यांनी वाढून ८,३६0.५५ अंकांवर बंद झाला. ग्रीसने सुधारित बचाव पॅकेज सादर केल्यामुळे युरोपीय बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून आले. चीनमधील बाजारांतही तेजीचेच वातावरण दिसून आले. आशियाई बाजारांत तेजी दिसून आली. शांघाय कंपोजिट ४.५४ टक्क्यांनी उसळला. हाँगकाँगचा हँग सेंग २.0८ टक्के, तर कोस्पी 0.८३ टक्के वाढला. बाजाराची एकूण व्याप्ती मजबूत राहिली. १,४३२ कंपन्यांचे समभाग वाढले. १,३७४ कंपन्यांचे समभाग घसरले. ११८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून २,८७0.१३ कोटी झाली. काल ती २,६७३.४0 कोटी होती. तत्पूर्वी काल विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी २५४.१0 कोटी रुपयांचे समभाग विकले.
सेन्सेक्स ८८ अंकांनी वाढला
By admin | Published: July 10, 2015 11:17 PM