- प्रसाद गो. जोशी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. सप्ताहात चार दिवस संवेदनशील निर्देशांक वाढलेला दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक २३४ अंशांनी वाढून बंद झाला.
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताह तेजीचा राहिला. बाजाराचा प्रारंभ निर्देशांक वाढीव पातळीवर (३५५४५.२२) खुला होऊन झाला. सप्ताहात संवदेनशील निर्देशांक ३५७९९.७१ ते ३५१०६.५७ अंशांदरम्यान फिरत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३५६५७.८६ अंशांवर बंद झाला. बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २३४.४८ अंश वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजीचे वातावरण दिसून आले. येथील निर्देशांक (निफ्टी) ५८.३५ अंशांनी वाढून १०७७२.६५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक संमिश्र राहिले. मिडकॅप निर्देशांकामध्ये ५९.२८ अंशांची घट झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस तो १५३९१.६२ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक १६०५९.९४ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये २७.७९ अंशांची वाढ झाली.
अमेरिकेने चीनच्या काही उत्पादनांच्या आयातीवर ३४ अब्ज डॉलरचे कर लादले आहेत. आगामी काळात आणखी काही वस्तूंवर कर लादले जाण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिका आणि चीन या जगातील दोन अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये आता व्यापार युद्ध रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहे. चीनकडून आता कोणती कारवाई केली जाते, याबाबत आता
बाजाराला उत्सुकता आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चीनकडून अमेरिकेला होणारी निर्यात केवळ ५.४ टक्के एवढी झाली आहे. मागील वर्षी याच काळात हा दर
१३.९ टक्के एवढा होता. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने जर्मनीची अर्थव्यवस्था
सुदृढ होत असल्याचे जाहीर
केल्याने युरोपमधील शेअर बाजार तेजीत राहिले.
एफपीआयकडून पाच दिवसांत ३१ कोटींची खरेदी
- एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून घेतल्यानंतर, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या पाच सत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. या पाच सत्रांमध्ये या संस्थांनी एकतीस कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
- भारतीय भांडवल बाजारात एफपीआयने २ ते ६ जुलै दरम्यान २२.३५ अब्ज रुपयांचे समभाग खरेदी केले. त्याचप्रमाणे, त्यांनी ८.९२ अब्ज रुपयांची गुंतवणूक डेट मार्केटमध्ये केली. अशा प्रकारे या संस्थांनी ३१.२७ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- मिड आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये गेल्या काही दिवसांत करेक्शन येऊन मोठी घट झाली आहे. या निर्देशांकांमधील समभाग सध्या चांगल्या किमतीला उपलब्ध आहेत. या संस्थांकडून प्रामुख्याने या समभागांचीच खरेदी झालेली दिसून येते.
संवेदनशील निर्देशांकात २३४ अंशांची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:09 AM2018-07-09T05:09:25+5:302018-07-09T05:09:55+5:30