मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून इतक्यात व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता नसल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारांत जोरदार गुंतवणूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४७.३३ अंकांनी वाढून २६,९३२.८८ अंकांवर बंद झाला. गेल्या पाच सत्रांत बीएसई सेन्सेक्सने १,३१६.0४ अंकांची वाढ मिळविली आहे. त्याबरोबर सेन्सेक्स दीड महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. २१ आॅगस्ट रोजी तो या पातळीवर होता. अन्य आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजार मात्र सपाट कल दर्शवीत होता. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला. त्याने २७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे कमावलेली वाढ त्याने बरीचशी गमावली. सत्राच्या अखेरीस तो २६,९३२.८८ अंकांवर बंद झाला. १४७.३३ अंकांची अथवा 0.५५ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.एनएसई निफ्टीही सकाळी तेजीने उघडला होता. एका क्षणी तो ८,१८0.९५ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस ३३.६0 अंकांची अथवा 0.४१ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ८,१५२.९0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक ५.८१ टक्क्यांनी वाढून ३३३.५0 रुपयांवर बंद झाला. सप्टेंबरमधील विक्रीचे उत्साहवर्धक आकडे तसेच जग्वार लँड रोव्हरची अमेरिकीतील चांगली कामगिरी याचा लाभ टाटा मोटर्सला झाला. अन्य ठळक लाभधारकांमध्ये आयटीसी, कोल इंडिया, सिप्ला, गेल, ओएनजीसी, एचयूल, डॉ. रेड्डीज, वेदांता, सन फार्मा, टाटा स्टील, आरआयएल, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि एलअँडटी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
विदेशी फंडामुळे सेन्सेक्स तेजीत
By admin | Published: October 07, 2015 5:09 AM