Join us

व्याजदर कपातीच्या आशेने सेन्सेक्स उसळला

By admin | Published: October 04, 2016 4:06 AM

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात केली जाऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून सोमवारी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात केली जाऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून सोमवारी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. त्याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ३७७ अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे १२७ अंकांनी वर चढला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळपासूनच तेजीत होता. सत्राच्या अखेरीस तो २८,२४३.२९ अंकांवर बंद झाला. त्याने ३७७.३३ अंकांची वाढ मिळविली. ६ सप्टेंबर नंतरची ही सर्वोच्च एकदिवशीय वाढ ठरली. त्या दिवशी सेन्सेक्स ४४५.९१ अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,७३८.१0 अंकांवर बंद होताना १२६.९५ अंकांनी वाढला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २८ कंपन्यांचे समभाग वाढले. टीसीएस आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांचे समभाग घसरले. (प्रतिनिधी)आशियाई बाजारांतही तेजीचे वातावरण होते. हाँगकाँगचा हँग सेंग १.२३ टक्के वाढला. जपानचा निक्केईही 0.९0 टक्के वर चढला. चीनमधील बाजार सुट्टीमुळे बंद होते. युरोपीय बाजारांत सकाळी वाढीचा कल दिसून आला. लंडनचा एफटीएसई १.११ टक्क्यांनी, फ्रान्सचा कॅक 0.३१ टक्क्यांनी वाढ दर्शवित होता. फ्रँकफूर्टचा डॅक्स मात्र, सुट्टीमुळे बंद होता.