Join us

Sensex in Modi Gov: मोदींच्या कार्यकाळात २५००० वरून ८०००० वर पोहोचला Sensex; १ लाखापर्यंत जाणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 12:59 PM

Sensex in Modi Gov: नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सेन्सेक्स २५००० ते ८०००० पर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येतेय.

Sensex in Modi Gov: नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सेन्सेक्स २५००० ते ८०००० पर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येतेय. या आठवड्यात १००० अंकांनी उसळलेल्या सेन्सेक्सनं आज नवा इतिहास रचला. बुधवार ३ जुलै ची नोंद इतिहासाच्या पानांमध्ये झाली जेव्हा आज सेन्सेक्सनं ८००७४.३ चा उच्चांक गाठला. आज सेन्सेक्सनं ८००१३ अंकांनी व्यवहार सुरू केला. तर एनएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीनं २२,३०७ अंकांचा नवा उच्चांक गाठला.

सेन्सेक्सने ८०००० ची पातळी ओलांडल्यानंतर बीएसईचं मार्केट कॅप ५.२५ लाख कोटी रुपयांपार गेलं. सेन्सेक्स ७०००० वरून ८०००० पर्यंत पोहोचायला फक्त सात महिने लागले. गेल्या वर्षी ११ डिसेंबररोजी सेन्सेक्स ७०,००० वर होता. तर, सेन्सेक्स ६०००० ते ७०००० पर्यंत पोहोचण्यास दोन वर्षांहून अधिक काळ लागला. गेल्या वर्षभरात सेन्सेक्स जवळपास २२ टक्क्यांनी वधारला आहे.

२०१४ मध्ये २१२२२ अंकांवर होता सेन्सेक्स

२०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा सेन्सेक्सनं २१२२२ च्या पातळीवर होता. मे महिन्यात मोदी सरकार सत्तेवर आले आणि वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्सने २७४९९ ची पातळी गाठली. पुढच्यावर्षी सेन्सेक्सने ३००२४ चा उच्चांक गाठला, पण नंतर तो २६११७ वर बंद झाला. २०१६ मध्ये तो २६६२६ वर बंद झाला.

२०१७ मध्ये सेन्सेक्समध्ये तेजी

२०१७ मध्ये सेन्सेक्स २६७११ च्या पातळीवर होता. वर्षाचा शेवट ३४०५६ च्या पातळीवर झाला. २०१८ मध्ये सेन्सेक्सनं ३८९८९ चा उच्चांक गाठला होता, पण अखेर तो ३६०६८ वर बंद झाला. २०१९ च्या निवडणुकीच्या वर्षात सेन्सेक्सनं ३६१६१ च्या पातळीवरून एन्ट्री घेतली आणि मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तो ४१२५३ वर पोहोचला.

तिसऱ्या कार्यकाळातही तेजी

२०१९ मध्ये जवळपास ५००० अंकांची झेप घेतल्यानंतर सेन्सेक्सनं ४१३४९ च्या पातळीसह २०२० मध्ये प्रवेश केला आणि नंतर ४७७५१ च्या पातळीवर आला. वर्ष २०२१ मध्ये सेन्सेक्सनं ११००० ची झेप घेत ५८२६३ वर झेप घेतली होती. २०२२ मध्ये तो ५८३१० वरून ६०८४० पर्यंत पोहोचला. तर २०२३ मध्ये ७२२४० वर पोहोचला.  यंदा सलग सातव्या महिन्यात सेन्सेक्सनं ८० हजारांचा टप्पा ओलांडला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही सेन्सेक्समध्ये तेजी सुरूच आहे. शेअर बाजारात अशीच तेजी राहिली तर मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात तो एक लाखांचा टप्पा ओलांडेल.

टॅग्स :नरेंद्र मोदीसरकारशेअर बाजार