मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी पुन्हा एकदा माना टाकल्या. सेन्सेक्स २६६.६७ अंकांनी घसरून २४,१८८.३७ अंकांवर बंद झाला. ही सेन्सेक्सची २0 महिन्यांची नीचांकी पातळी ठरली आहे. कच्च्या तेलाच्या किमती २८ डॉलरच्या खाली घसरल्याने जगभरातील शेअर बाजारांत नैराश्य पसरले आहे. डिसेंबरमध्ये ११.६ अब्ज डॉलरपर्यंत वाढलेली व्यापारी तूट, तसेच १४.७५ टक्क्यांनी घसरलेली निर्यात याचाही परिणाम बाजारांवर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.खरे म्हणजे सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला होता. त्यानंतर तो २४,५२५.८५ अंकांपर्यंत वर चढला होता. टाटा स्टील, विप्रो आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या समभागांतील तेजीमुळे सेन्सेक्स वर चढला होता. तथापि, ही तेजी टिकू शकली नाही. सेन्सेक्स २६६.६७ अंकांनी अथवा १.0९ टक्क्यांनी घसरून २४,१८८.३७ अंकांवर बंद झाला. १६ मे २0१४ नंतरचा हा नीचांकी बंद ठरला आहे. १६ मे २0१४ रोजी सेन्सेक्स २४,१२१.७४ अंकांवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टीही विक्रीच्या दबावात होता. ७,३५१ अंकांवर बंद होताना त्याने ८६.८0 अंकांची अथवा १.१७ टक्क्यांची घसरण नोेंदविली. सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. रिलायन्सचा समभाग सर्वाधिक ५.१४ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल बजाज आॅटो, एशियन पेंटस्, सिप्ला, कोल इंडिया, ओएनजीसी, एलअँडटी, डॉ. रेड्डीज, एसबीआय, एचडीएफसी, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एमअँडएम, इन्फोसिस आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग घसरले.
सेन्सेक्स २६७ अंकांनी आपटला
By admin | Published: January 19, 2016 3:12 AM