Join us

सेन्सेक्स, निफ्टीने गाठली आणखी नवीन उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:44 AM

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत राहिला.

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने, तसेच निफ्टीने आणखी नवीन उंची गाठली.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह तेजीचाच राहिला. बाजार सतत ७ आठवडे वाढीव पातळीवर बंद झाला असून, गेल्या सहा वर्षांमधील ही सर्वाेच्च कामगिरी आहे. गेल्या ७ सप्ताहांमध्ये निर्देशांक २६७९ अंश म्हणजेच ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. संवेदनशील निर्देशांक ३४६८७.२१ अंशांवर खुला झाला. त्यानंतर, तो ३५५४२.५८ अंशांपर्यंत वाढत गेला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३५५११.५८ अंशांवर बंद झाला.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ही नवीन उच्चांकावर पोहोचला आहे. सप्ताहाच्या अखेरीस या निर्देशांकामध्ये २०३.४५ अंशांनी वाढ होऊन तो १०८९४.७० अंशांवर बंद झाला आहे. मात्र, बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांना या सप्ताहामध्ये फटका बसला. मिडकॅप निर्देशांक ३७२.०३ अंशांनी खाली येऊन १७७६५ अंशांवर स्थिरावला, तर स्मॉलकॅप निर्देशांकामध्येही ५३७.०३ अंशांनी घट झाली. हा निर्देशांक १९४५६.१६ अंशांवर बंद झाला आहे.जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत काही वस्तूंवरील कराचा दर कमी करण्याचा झालेला निर्णय बाजाराला चालना देणारा ठरला. आगामी अर्थसंकल्पामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून, बाजारात या क्षेत्राचे समभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचप्रमाणे, विविध आस्थापनांचे तिमाही निकाल समाधानकारक असल्याने बाजार वाढला आहे. परकीय वित्तसंस्थांनीही भारतीय बाजारात मोठी खरेदी केली आहे. चालू महिन्यात या संस्थांनी ८७०० कोटी रुपये भारतीय बाजारामध्ये गुंतविले आहेत.ओएनजीसी घेणार एचपीसीएलचे समभाग-सार्वजनिक क्षेत्रातील आॅइल अँड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशन (ओएनजीसी)ने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पाेरेशन लि. (एचपीसीएल) चे ५१ टक्के समभाग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा करार लवकरच केला जाणार आहे.एचपीसीएलमधील सरकारचे ५१ टक्के समभाग ओएनजीसी ही सरकारी आस्थापना खरेदी करणार आहे. यामुळे सरकारला निर्गुंतवणुकीद्वारे सुमारे ३७ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सरकारचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नसले, तरी यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.ओएनजीसी एचपीसीएलच्या समभागांची खरेदी शुक्रवारच्या बंद भावाच्या १४ टक्के अधिक दराने करणार आहे. याबाबतची कायदेशीर पूर्तता या महिन्याच्या अखेरपर्यंत केली जाणार आहे.

टॅग्स :निर्देशांक