मुंबई : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळे शेअर बाजारात तेजीने उसळी घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक नव्या विक्रमी उंचीवर बंद झाले.
नरेंद्र मोदी सरकारचे पहिले बजेट सकारात्मक असेल. राजकोषीय तुटीवर अंकुश आणला जाईल तसेच वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले जातील, असे संकेत काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले होते. त्याचप्रमाणे विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारातील गुंतवणूक वाढल्यामुळे धारणा मजबूत झाली आहे. या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
शेअर बाजारातील सर्व १२ वर्गांतील निर्देशांक आज तेजीने बंद झाले. बहुतांश सर्वच वर्गात सरासरी २ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. सर्वाधिक लाभ धातू, आरोग्य सेवा, वीज, भांडवली वस्तू, वाहन, एफएमसीजी, बॅकिंग आणि टिकाऊ वस्तू क्षेत्रात दिसून आला.
आशियाई शेअर बाजारातील मजबुतीमुळे भारतीय बाजारात खरेदीचा जोर वाढला. त्याचा परिणाम होऊन मुंबई शेअर बाजाराचा ३० कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ३२४.८६ अंकांच्या अथवा १.२७ टक्क्याच्या वाढीसह २५,८४१.२१ अंकावर पोहोचला. सत्रादरम्यान तो २५,८६४.५३ अंकांपर्यंत वर चढला होता. ही आजपर्यंतची सर्वाधिक उंची ठरली आहे. गेल्या सलग ४ सत्रांत सेन्सेक्सने ७७८.५४ अंकांची कमाई केली आहे. ही वाढ ३.११ टक्के आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ९०.४५ अंक म्हणजेच १.१८ टक्क्याच्या वाढीसह ७,७२५.१५ अंकावर बंद झाला. हा निफ्टीचा सार्वकालीक उच्चांकी बंद आहे. व्यावसायिक सत्रादरम्यान, निफ्टी ७,७३२.४० अंकावर पोहोचला होता. गेल्या सलग चार सत्रांत निफ्टीने २३२ अंकांची वाढ मिळविली आहे. सेन्सेक्स आता २६ हजारांच्या उंबरठ्यावर, तर निफ्टी ८ हजारांच्या उंबरठ्यावर आहे.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, ही बजेटपूर्व तेजी आहे. या तेजीत विदेशी संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीची भूमिका महत्त्वपूर्ण होती. अस्थायी आकडेवारीनुसार, विदेशी संस्थांनी काल ८५६.३५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सेन्सेक्स, निफ्टीची पुन्हा विक्रमी झेप
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळे शेअर बाजारात तेजीने उसळी घेतली आहे.
By admin | Published: July 3, 2014 05:15 AM2014-07-03T05:15:41+5:302014-07-03T05:15:41+5:30