प्रसाद गो. जोशी
अमेरिका आणि चीन यांच्यात पुढील महिन्यात व्यापार करार होणार असल्याने जगभरातील शेअर बाजारांत आलेली तेजीची लहर, परकीय वित्तसंस्थांची खरेदी, आगामी अर्थसंकल्पात सवलतींची अपेक्षा या पार्श्वभूमीवर शेअर बाजारही उसळले. सप्ताहामध्ये संवेदनशील, निफ्टी आणि बॅँक निफ्टी या तीन निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदविले.
मुंबई शेअर बाजारात मागील सप्ताहाप्रमाणेच सुरुवात वाढीने झाली. संवेदनशील निर्देशांक ४१,१६८.८५ अंशांवर खुला झाला. त्यानंतर तो ४१,८०९.९६ अंश ते ४०,९१७.९३ अंशांदरम्यान हेलकावत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ४१,६८१.५४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा तो ६७१.८३ अंशांनी (१.६३ टक्के) वाढला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही तेजीचे वातावरण राहिले. येथेही मोठ्या प्रमाणावर खरेदीचे व्यवहार झाले. सप्ताहामध्ये येथील निर्देशांक (निफ्टी) १८५.१० अंश वाढून १२,२७१.८० अंशांवर बंद झाला. या सप्ताहात निफ्टीने १२,२९३.९० अंश असा नवीन उच्चांक नोंदविला. बॅँक निफ्टी या निर्देशांकानेही सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ३२,४४३.३५ अंश अशी सर्वाेच्च पातळी गाठली. केंद्राच्या बॅँकांबाबतच्या सकारात्मक धोरणामुळे बॅँकांचे समभाग तेजीत असून, त्याचाच फायदा बॅँक निफ्टीला नवीन उच्चांक गाठण्यासाठी मिळाला.